सुकुमार दिग्दर्शित ‘पुष्पा २: द रुल’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कब्जा केला आहे. यामधील अल्लू अर्जुनचा ‘फायर नहीं वाइल्ड फायर है’ हा डायलॉग ‘पुष्पा २: द रुल’ चित्रपटाने सत्यात उतरवल्याचं पाहायला मिळत आहे. फक्त भारतातच नाही तर जगभरात अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदानाच्या या चित्रपटाला तुफान प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळेच प्रदर्शनाच्या ३१व्या दिवशीदेखील ‘पुष्पा २: द रुल’ चित्रपटाने कोट्यावधींची कमाई केली आहे.
‘पुष्पा २: द रुल’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत असताना अॅटली कुमार दिग्दर्शित ‘बेबी जॉन’ चित्रपट प्रदर्शित झाला. ख्रिसमसचं औचित्य साधून २५ डिसेंबरला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात वरुण धवन प्रमुख भूमिकेत आहे. पण, या चित्रपटाला प्रेक्षकांचा प्रतिसाद पाहिजे तसा मिळत नाहीये. शनिवारी ‘पुष्पा २: द रुल’ आणि ‘बेबी जॉन’ चित्रपटाने किती कोटींची कमाई केली? जाणून घ्या…
‘पुष्पा २: द रुल’ चित्रपटाच्या दिवसाच्या कमाईत कधी घट तर कधी वाढ होताना दिसत आहे. सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, ३०व्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी ‘पुष्पा २: द रुल’ चित्रपटाने ३.७५ कोटींची कमाई केली होती. पण शनिवारी कमाईत वाढ झाली. सुकुमारच्या चित्रपटाने ३१व्या दिवशी ५.५ कोटींचा गल्ला जमवला. यामध्ये हिंदी व्हर्जनने ४.३५ कोटी, तेलुगू व्हर्जनने १ कोटी, तमिळ ०.१४ कोटी आणि कन्नड ०.१ कोटींची कमाई आहे.
आतापर्यंत भारतात ‘पुष्पा २: द रुल’ चित्रपटाने ११९९ कोटींची बक्कळ कमाई केली आहे. यामध्ये हिंदी व्हर्जनने ७८५ कोटी, तेलुगू व्हर्जनने ३३३.५१ कोटी, तमिळ व्हर्जनने ५७.९८ कोटी, कन्नड व्हर्जनने ७.७१ आणि मल्याळम व्हर्जनने १४.१५ कोटींची कमाई आहे.
विजय थलापतिच्या ‘थेरी’ चित्रपटाचा रिमेक असलेला ‘बेबी जॉन’ला पाहिजे तसा प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळत नाहीये. प्रदर्शनापासून वरुण धवनच्या चित्रपटाची कमाई कमी असल्याचं म्हटलं जात आहे. ‘बेबी जॉन’ चित्रपट आतापर्यंत ४० कोटींचा व्यवसाय देखील करू शकला नाही. शनिवारी ‘बेबी जॉन’ चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळालेला नाही. १ कोटी रुपयांचा गल्ला वरुणचा चित्रपट जमवू शकला नाही.