इम्तियाज अलीने दिग्दर्शित केलेला बायोपिक ‘अमरसिंग चमकीला’ चित्रपट सध्या चर्चेत आहे. हा चित्रपट पंजाबमधील गायक अमरसिंग चमकिला यांच्या जीवनावर बेतलेला आहे. त्यांची गोळ्या झाडून २७ व्या वर्षी हत्या करण्यात आली होती. १२ एप्रिल रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात दिलजीत दोसांझने अमर सिंग चमकीला तर परिणीती चोप्राने त्यांची पत्नी अमरजोतची भूमिका केली होती. अमरजोतशी लग्न करण्यापूर्वी चमकीला यांचं लग्न गुरमेल कौरशी झालं होतं. पहिल्या लग्नापासून त्यांना अमनदीप कौर आणि कमलदीप कौर या दोन मुली झाल्या. तर, दुसरी पत्नी अमरजोतपासून त्यांना मुलगा जैमन चमकिला आहे.
गेल्या वर्षी दिलेल्या एका मुलाखतीत जैमन त्याच्या वडिलांची हत्या, त्याचं सावत्र आई व बहिणीशी असलेलं नातं याबाबत खुलासा केला होता. वडिलांची पहिली पत्नी व त्यांच्या मुलींच्या संपर्कात असल्याचं जैमनने म्हटलं होतं. “मी माझे वडील अमरसिंग चमकीला यांच्या पहिल्या कुटुंबाच्या संपर्कात आहे. त्यांना त्यांच्या पहिल्या पत्नीपासून दोन मुली आहेत. मला दोन सावत्र बहिणी असून अमनदीप आणि कमलदीप अशी त्यांची नावं आहेत. मोठी बहीण विवाहित असून लहान बहिणीचं लग्न होणार आहे,” असं गेल्या वर्षी ‘सिने पंजाबी’ ला दिलेल्या मुलाखतीत जैमन म्हणाला होता.
लिव्ह इनचा सल्ला देणाऱ्या झीनत अमानवर भडकल्या मुमताज; म्हणाल्या, “ती मजहर खानला लग्नाआधी…”
“मी त्यांना भेटायला गेल्यावर त्या माझ्याशी छान वागतात. सुरुवातीपासूनच आम्ही संपर्कात आहोत, जे आहे त्यात माझी सावत्र आई किंवा आम्हा मुलांची चूक नाही,” असं जैमन म्हणाला. पतीला गमावल्याचं दुःख त्यांच्या पहिल्या पत्नीला आहे का, असं विचारल्यावर जैमन म्हणाला, “कधीकधी आम्ही त्याबाबत बोलतो आणि त्या म्हणायच्या की तुझे वडील असते तर आमची अशी अवस्था नसती. त्यांनी खरोखर खूप मेहनत केली, पण लोकांची त्यांच्यावर वाईट नजर होती, त्यांचे खूप शत्रू होते. मला बहिणीही आहेत, आम्ही आमचं दु:ख जमेल तितकं एकमेकांशी शेअर करण्याचा प्रयत्न करतो.”
अमरसिंग चमकीला यांचा मुलगा जैमन हा गायक आहे. त्याच्या आई-वडिलांच्या खूनानंतर त्याचं पालनपोषण त्याच्या आजी-आजोबांनी केलं. दरवर्षी चमकीला यांच्या पुण्यतिथीला जैमन आणि त्याच्या बहिणी कार्यक्रमाचं आयोजन करतात.