सुपरहिट ठरलेल्या ‘कहो ना… प्यार है’ या चित्रपटाच्या यशाबद्दल बोलताना अभिनेत्री अमिषा पटेलने तिची या सिनेमात निवड कशी झाली यावर प्रकाश टाकला आहे. २००० साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने त्या वर्षातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा म्हणून इतिहास घडवला होता. याच चित्रपटाने हृतिक रोशनला एकाच रात्रीत सुपरस्टार बनवले. चित्रपटाचे शूटिंग सुरू होण्याच्या केवळ तीन दिवस आधी अमिषा पटेलची या चित्रपटासाठी निवड करण्यात आली होती.
‘ब्युटीबायबी’ला दिलेल्या मुलाखतीत अमिषाने पहिल्यांदा राकेश रोशन यांच्याशी झालेल्या भेटीची आठवण सांगितली. ती म्हणाली, “मी माझ्या कुटुंबाबरोबर माझी इच्छा नसताना एका लग्नसमारंभाला गेले होते. त्यावेळी मी आर्थिक विश्लेषक म्हणून काम करत होते. सोहळ्यातून बाहेर पडत असताना राकेश रोशन यांची नजर माझ्यावर गेली आणि त्यांनी माझ्या वडिलांना विचारले, ‘गर्लफ्रेंड?’ त्यावर माझ्या वडिलांनी उत्तर दिलं, ‘नाही राकेश, ही अमिषा आहे. नुकतीच ती बोस्टनहून शिक्षण पूर्ण करून परतली आहे.”
या घटनेनंतर लगेचच राकेश रोशन यांनी अमिषाला दुसऱ्या दिवशी त्यांच्या घरी लंचसाठी आमंत्रित केलं. ती म्हणाली, “माझा खरंतर जायचा मूड नव्हता, पण तरीही मी गेले. मला माहीत नव्हतं की हा लंच मला पहिल्या चित्रपटाची ऑफर देण्यासाठी आहे.”
पहिला संवाद आणि अभिनयाचा प्रस्ताव
लंचसाठी पांढरा टी-शर्ट, जीन्स अशा साध्या लूकमध्ये गेलेली अमिषा जेव्हा राकेश रोशन यांच्या घरी पोहोचली, तेव्हा तिला हृतिकबरोबर गप्पा मारण्याची संधी मिळाली. “मी आणि हृतिक बालपणी मित्र होतो. मी त्याला खूप वर्षांनी पाहिलं आणि मनात म्हटलं, ‘अरे व्वा, हा तर खूप देखणा झाला आहे’ आणि मग मी त्याला विचारलं, ‘वॉशरूम कुठे आहे?’
अमिषा म्हणाली, “मी वॉशरूममध्ये असताना राकेश अंकल आणि हृतिक यांच्यात एक महत्त्वाची चर्चा झाली. नंतर त्यांनी मला सांगितलं की, लग्नसमारंभातून परतल्यानंतर राकेश अंकल संपूर्ण रात्र झोपू शकले नाहीत. त्यांनी ठरवलं होतं, ‘आपली सोनिया सापडली आहे!’ हृतिकही मला बघण्यासाठी आतुरतेने वाट पाहत होता. मी वॉशरूममध्ये असतानाच त्यांनी एकमेकांना थम्ब्स-अप दिलं, पण मला अजूनही समजलं नव्हतं की मला तिथे नेमकं कशासाठी बोलावलं आहे.”
भविष्याचा विचार आणि अभिनयाचा प्रस्ताव
लंचनंतर घरी परतण्याच्या तयारीत असताना राकेश रोशन यांनी अमिषाला तिच्या भविष्याबद्दल विचारलं. अमिषाने सांगितलं, “माझं शिक्षण पूर्ण झालं आहे. मॉर्गन स्टॅन्ली कंपनीतून मला ऑफर आली आहे, पण अजून निर्णय घेतला नाही.” तेव्हा राकेश रोशन यांनी तिला विचारलं, “तू कधी अभिनयाचा विचार केला आहेस का?” अमिषाने उत्तर दिलं, “मी शाळेत आणि विद्यापीठात काही स्किट्स केल्या आहेत. मला अभिनयासाठी काही बक्षिसंही मिळाली आहेत, पण बॉलीवूडमध्ये काम करण्याचा विचार मी कधीच केला नव्हता.”
राकेश रोशन यांनी लगेचच एक करार पत्र काढलं आणि म्हणाले, “मी तुला एका चित्रपटात संधी देतोय, तुला हा सिनेमा करायचा आहे का?” त्यावर अमिषाने विचारलं, “काय चित्रपट?” ते म्हणाले, “मी तुला माझ्या मुलाबरोबर लाँच करू इच्छितो.” त्यावर ती म्हणाली, “खरंच? पण, मला अभिनयाबद्दल काहीच माहिती नाही.”
संधी स्वीकारण्याचा निर्णय
त्या क्षणी, थोडा विचार करून अमिषाने या संधीला होकार दिला. ती म्हणाली, “मी विचार केला, सगळ्यात वाईट काय होईल? चित्रपट फ्लॉप झाला तरी माझं शिक्षण आणि करिअर आहेच. यापूर्वी विनोद खन्ना अंकलने ‘हिमालय पुत्र’साठी, तर फिरोज खान अंकलने ‘प्रेम अगन’साठी मला विचारलं होतं, पण त्या वेळी शिक्षणात व्यग्र असल्याने मी नकार दिला होता. त्यावेळी चित्रपटक्षेत्राचा मी करिअर म्हणून विचार केला नव्हता. पण, ‘कहो ना… प्यार है’ बहुधा माझ्यासाठीच तयार झाला होता.”
हेही वाचा…‘हा’ साऊथ सुपरस्टार पत्नी अन् मुलांसह मुंबईत झाला स्थायिक; म्हणाला, “या शहरातील शांती आणि…”
अनपेक्षित प्रवासाची सुरुवात
अमिषाने पुढे सांगितलं की, तिला वाटलं होतं की शूटिंग सुरू होण्यासाठी सहा महिने लागतील, त्यामुळे तयारीसाठी वेळ मिळेल. पण, राकेश अंकल म्हणाले, “नाही अमिषा, आपण तीन दिवसांतच शूटिंग सुरू करणार आहोत.” यामुळे ती थोडी स्तब्ध झाली. तिला अभिनयाबद्दल काहीच ज्ञान नव्हतं, त्यामुळे कॅमेऱ्यासमोर कसं वागायचं याचंही तिला भान नव्हतं. “राकेश अंकल ‘राइट’ म्हणायचे आणि मी चुकून ‘लेफ्ट’ला जायची, कारण कॅमेऱ्याचे अँगल उलट असतात,” असं अमिषा म्हणाली. ‘कहो ना… प्यार है’ रिलीज झाला आणि प्रचंड हिट ठरला. हृतिक आणि अमिषा एका रात्रीत स्टार झाले होते.