‘गदर: एक प्रेम कथा’ या चित्रपटाच्या सिक्वेलची सध्या चांगलीच चर्चा आहे. ‘गदर-२’ मध्ये पुन्हा एकदा सनी देओल आणि अमिषा पटेलची जोडी प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचे प्रेक्षक अत्यंत आतुरतेने वाट पाहत आहेत. आता या चित्रपटाबाबत अभिनेत्री अमिषा पटेलने केलेलं एक वक्तव्य खूप चर्चेत आलं आहे.
‘गदर-२’च्या घोषणेपासूनच या चित्रपटाकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. या चित्रपटाच्या पोस्टरला, टीझरला प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळाला. त्यानंतर या चित्रपटातील काही ॲक्शन सीनचे ‘बिहाइंड द सीन’ व्हिडीओही व्हायरल झाले होते. आता या चित्रपटाच्या प्रमोशनला टीमने सुरुवात केली आहे. “या चित्रपटात तारा सिंगने प्रेमासाठी इस्लाम धर्म स्वीकारला,” असं म्हणत अमिषाने या चित्रपटाचा उद्देश काय आहे, हे सांगितलं.
मीडियाशी संवाद साधताना अमिषा म्हणाली, “विविध समाजांमध्ये एकोपा निर्माण करून शांतता आणि एकजूट तयार करण्याचा या चित्रपटाचा उद्देश आहे. ‘गदर’ने कोणामध्येही तिरस्कार निर्माण केला नाही, तर सर्वांबद्दल फक्त प्रेम दर्शवलं. एका मुस्लीम मुलीने हिंदू मुलाशी लग्न केलं आणि तरीही ती तिचा धर्म विसरली नाही. इतकंच नाही तर, सनी देओल साकारत असलेल्या तारा सिंगनेही त्याच्या प्रेमासाठी इस्लामचा स्वीकार केला. हा चित्रपट लोकांमध्ये एकोप्याची भावना निर्माण करतो.”
हेही वाचा : Video: ‘गदर २’ चित्रपटातील ॲक्शन सीन लीक, तारा सिंगचा जबरदस्त अंदाज एकदा पाहाच
दरम्यान, २००१ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘गदर’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली होती. आता जवळपास २२ वर्षांनंतर या चित्रपटाचा सिक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘गदर-२’ ११ ऑगस्ट २०२३ रोजी प्रदर्शित होणार आहे.