बॉलीवूडचे कलाकार हे नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. कधी त्यांच्या चित्रपटांमुळे, कधी त्यांच्या मुलाखतीदरम्यान केलेल्या वक्तव्यांमुळे, तर कधी त्यांच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे हे कलाकार चर्चांचा भाग बनतात. आता अभिनेता अर्जुन कपूर (Arjun Kapoor) सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या एका व्हिडीओमुळे सध्या चर्चेत आहे.
अर्जुन कपूरच्या ‘त्या’ कृतीनं नेटकऱ्यांची जिंकली मनं!
अभिनेता अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा यांनी दिल्लीत पार पडलेल्या ‘इंडिया कॉउचर वीक २०२४’ या कार्यक्रमाला हजेरी लावल्याचे पाहायला मिळाले. समोर आलेल्या व्हिडीओमध्ये मलायका आणि अर्जुन पहिल्या रांगेत बसलेले दिसत आहेत. महत्त्वाचे म्हणजे, एकाच रांगेत असूनही ते शेजारी बसले नाहीत, तर वेगवेगळ्या ठिकाणी बसले आहेत. आता या कार्यक्रमादरम्यानचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये अर्जुन कपूर चाहत्यांनी वेढलेला दिसत आहे. हे चाहते त्याच्याबरोबर सेल्फी काढत आहेत. त्याचवेळी मलायका त्या ठिकाणी येते, मात्र अर्जुनभोवती चाहत्यांची गर्दी असल्याने तिला पुढे जाता येत नाही. त्यावेळी अर्जुन चाहत्यांना मलायकासाठी वाट करून देण्यासाठी सांगतो आणि मलायका पुढे जाते. असे या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटकरी अर्जुन कपूरचे कौतुक करताना दिसत आहेत.
गेल्या अनेक दिवसांपासून या दोघांचे ब्रेकअप झाल्याच्या चर्चा सुरू आहेत. काही दिवसांपूर्वीच अर्जुन कपूरने सोशल मीडियावर एक स्टोरी शेअर करत लिहिले होते, “सकारात्मक असणे म्हणजे सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील, तुम्हाला हव्या तशा घडतील असे नाही; तर गोष्टी कशाही घडू देत, कोणत्याही परिस्थितीत तुम्ही व्यवस्थित राहणार आहात, तुम्ही ठीक राहणार आहात हे माहीत असणे म्हणजे सकारात्मकता होय.” आता अर्जुन कपूरने पोस्ट केलेल्या या ओळींचा संबंध त्याच्या आणि मलायका अरोराच्या नात्याबद्दल आहे, असा नेटकऱ्यांनी अंदाज लावला होता. मलायका अरोराने १९९८ साली अरबाज खान बरोबर लग्नगाठ बांधली होती. मात्र, १९ वर्षांनंतर ते एकमेकांपासून वेगळे झाले. त्यानंतर अर्जुन आणि मलायका यांनी डेट करायला सुरुवात केली.
दरम्यान, अर्जुन कपूरच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘सिंघम अगेन’ या चित्रपटामध्ये अर्जुन कपूर खलनायकाची भूमिका साकारणार आहे. करीना कपूर, दीपिका पदुकोण, अजय देवगण, रणवीर सिंग हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. याबरोबरच अभिनेता ‘नो एन्ट्री-२’ या चित्रपटातदेखील झळकणार आहे.