Vijay Varma Talk About Relationship: अभिनेता विजय वर्मा गेल्या काही दिवसांपासून वैयक्तिक आयुष्यामुळे खूप चर्चेत आहे. विजयचा तमन्ना भाटियाशी ब्रेकअप झाल्याची चर्चा होत आहे. अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवरील विजयबरोबरचे फोटो डिलीट केल्यापासून दोघांमध्ये बिनसलं असल्याचं म्हटलं जात आहे. पण, काही दिवसांआधी विजय व तमन्ना एकाच ठिकाणी धुलीवंदन साजरी करताना दिसले. रवीना टंडनच्या घरी धूळवड खेळतानाचे विजय व तमन्नाचे फोटो व्हायरल झाले होते, त्यामुळे दोघांचा ब्रेकअप झाला आहे की नाही? असा प्रश्न उपस्थित होत आहे. अशातच विजय वर्माने रिलेशनशिपसंबंधित केलेलं वक्तव्य सध्या खूप चर्चेत आलं आहे. अभिनेत्याने रिलेशनशिपची तुलना आइस्क्रीमशी केली आहे.
‘आयएएनएस’शी संवाद साधताना अभिनेता विजय वर्माने रिलेशनशिपबाबत आपलं मत मांडलं. तमन्ना भाटियाबरोबरच ब्रेकअपच्या चर्चेवर विजयने मौन धारण केलं. पण, त्याने रिलेशनशिपबद्दल असं काही वक्तव्य केलं, ज्याची सध्या खूप चर्चा होत आहे.
विजय वर्मा म्हणाला, ‘जर तुम्ही रिलेशनशिपचा आईस्क्रीमप्रमाणे आस्वाद घेतला तर तुम्ही नेहमीच आनंदी रहाल, त्यामध्ये तुम्हाला कोणताही फ्लेवर मिळो, तो स्वीकारा आणि पुढे चला.” याच वक्तव्यामुळे विजय सध्या चर्चेत आला आहे.
दरम्यान, नेटफ्लिक्सवरील ‘लस्ट स्टोरीज २’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान विजय वर्मा आणि तमन्ना भाटियाची पहिली भेट झाली होती. त्यानंतर दोघांची चांगली मैत्री झाली. दोन वर्षांपूर्वी जेव्हा न्यू इअरच्या गोव्यातील पार्टीमध्ये विजय आणि तमन्ना एकत्र दिसले, तेव्हापासून त्यांच्या अफेअरच्या चर्चांना उधाण आलं. त्यानंतर दोघं मुंबई विमानतळावरही एकत्र पाहायला मिळाले. ‘लस्ट स्टोरीज २’ चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी विजय व तमन्नाने प्रेमाची कबुली दिली. पण, मार्च महिन्याच्या सुरुवातीला दोघांचा ब्रेकअप झाल्याचं समोर आलं. मात्र, अद्याप विजय व तमन्नाने ब्रेकअप झाल्याचं अधिकृतरित्या जाहीर केलेलं नाही. ‘पिंकविला’च्या वृत्तानुसार, विजय व तमन्नाने ब्रेकअपनंतर दोघांमध्ये चांगली मैत्री ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. दोघं अजूनही इन्स्टाग्रामवर एकमेकांना फॉलो करत आहेत.
विजय वर्माच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर लवकरच तो ‘मटका किंग’ वेब सीरिजमध्ये पाहायला मिळणार आहे. याशिवाय तो बऱ्याच सीरिज व चित्रपटांमध्ये झळकणार आहे. तसंच तमन्ना भाटिया अलीकडेच दाक्षिणात्य चित्रपट ‘ओडेला २’मध्ये दिसली. या तेलुगू चित्रपटात तिचा एक वेगळाच अवतार पाहायला मिळाला. आता तमन्नाजवळ बरेच चित्रपट आहेत, ज्याची अद्याप घोषणा झालेली नाही.