‘द परफेक्शनिस्ट’ अशी ओळख असणारा बॉलीवूड अभिनेता आमिर खान नेहमी वैविध्यपूर्ण कलाकृती प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत असतो. ‘दंगल’, ‘लगान’, ‘पीके’, ‘तारे जमीन पर’ यांसारख्या अनेक उत्तमोत्तम कलाकृतींमध्ये आमिर खानने काम करीत प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. आमिर खान शेवटचा ‘लालसिंग चड्ढा’ या चित्रपटात पाहायला मिळाला होता. हा ‘फॉरेस्ट गंप’ या हॉलीवूड चित्रपटाचा रिमेक होता. त्यानंतर अद्याप आमिर खान दुसऱ्या कोणत्याही चित्रपटात पाहायला मिळाला नाही.
अशातच आता आमिर खान लवकरच एक भव्य कलाकृती घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आमिर खान महाभारतावर आधारित एक नवीन चित्रपट बनवणार असल्याचं त्यानं म्हटलं आहे. ‘द हॉलीवूड रिपोर्टर इंडिया’शी संवाद साधताना त्यानं याबाबत वक्तव्य केलं आहे. आमिरने म्हटले आहे, “लवकरच ‘महाभारत’ या चित्रपटाचं काम सुरू करणार आहे. चित्रपटाची निर्मिती मी स्वत: करणार असून, या वर्षी चित्रपटाचं काम सुरू होईल. पण सुरुवातीचा बराच काळ चित्रपटाच्या लिखाणासाठी जाईल”.
याबाबत बोलताना त्याने सांगितले की, या चित्रपटाचे ‘लॉर्ड ऑफ द रिंग्ज’ या हॉलीवूड सीरिजप्रमाणे अनेक भाग बनविण्यात येतील. या चित्रपटाचं लिखाण पूर्ण होण्यासाठी बराच मोठा काळ जाईल”. पुढे तो म्हणाला, “या चित्रपटात मी असेन की नाही हे अद्याप सांगू शकत नाही. त्याची संपूर्ण जबाबदारी कास्टिंग टीमची आहे. त्यामुळे आम्ही कलाकारांची निवड करताना कोण कोणत्या भूमिकेसाठी योग्य आहे हे पाहूनच त्यांची निवड करू”.
“मला वाटत नाही की, महाभारत एका भागातून सांगितलं जाऊ शकतं. म्हणून आम्ही या चित्रपटाचे अनेक भाग करण्याचा विचार करीत आहोत. इतक्यात सांगता येणार नाही; पण त्यासाठी आम्हाला इतर दिग्दर्शकांची गरज भासू शकते”. त्यामुळे आता बॉलीवूडमध्ये बऱ्याच काळानंतर एक पौराणिक चित्रपट प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
दरम्यान, आमिर खान लवकरच ‘सितारे जमीन पर’ या चित्रपटात झळकणार आहे. विशेष म्हणजे त्यामध्ये अभिनेत्री जिनिलिया देशमुखही महत्त्वाच्या भूमिकेत असणार आहे. हा चित्रपट २००७ साली आलेल्या ‘तारे जमीन पर’चा दुसरा भाग आहे. येत्या २० जून २०२५ रोजी तो प्रदर्शित होणार आहे.