अमिताभ बच्चन यांचे कुटुंब बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. त्याचं कारण म्हणजे अभिषेक आणि ऐश्वर्या राय वेगळे होणार आहेत, ऐश्वर्या आणि श्वेता बच्चन यांच्यात मतभेद आहेत आणि अभिषेक व ऐश्वर्या वेगळे राहत आहे, असे दावे या जोडप्याबद्दल केले जात आहेत. गेल्या काही दिवसांपासून ऐश्वर्या व अभिषेकच्या नात्याबाबत बऱ्याच चर्चा होत आहेत. याच दरम्यान, बच्चन कुटुंब पुन्हा एकदा एकत्र दिसलं आहे.
अलीकडेच अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन तिची मुलगी आराध्या, पती अभिषेक बच्चन आणि सासरे अमिताभ बच्चन यांच्यासह एका कबड्डी सामन्यात दिसली. त्यांच्या आनंदी कुटुंबाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यासोबतच आराध्या बच्चनचा नवा लूकही चर्चेत आहे.
शनिवारी ६ जानेवारी रोजी मुंबईतील सरदार वल्लभभाई पटेल इनडोअर स्टेडियममध्ये बच्चन कुटुंब प्रो कबड्डी लीगचा सामना पाहण्यासाठी आले होते. अमिताभ, ऐश्वर्या व आराध्या हे तिघेही अभिषेकबरोबर स्टँडमध्ये बसले होते आणि त्यांनी जयपूर पिंक पँथर्सची जर्सी घातली होती. जयपूर पिंक पँथर्सचा सामना यू मुंबाशी झाला. यू मुंबा संघाने सामन्यात ३१ पॉइंट्स मिळवले. तर जयपूर पिंक पँथर्सने ४१ पॉइंट्स मिळवून विजय मिळवला होता. जयपूर पिंक पँथर्स हा अभिषेकचा संघ आहे.
‘स्टार स्पोर्ट्स’ने एक्सवर एक व्हिडीओ शेअर केला आहे, जो सामन्यादरम्यानचा आहे. व्हिडीओमध्ये ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन यांचे चाहते आनंदाने नाचत आहेत. अमिताभ बच्चन यांनी मुलगा, सून आणि नातीसह या सामन्याचा आनंद लुटला. व्हिडीओतील आराध्याच्या नव्या लूकनेही लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. “मुंबई लेगच्या पहिल्या सामन्यात जयपूर पिंक पँथर्सचा विजय पाहण्यासाठी अमिताभ, ऐश्वर्या आणि अभिषेक सर्व उपस्थित होते,” असं त्यांनी कॅप्शन दिलं होतं.
‘खल्लास गर्ल’चा १४ वर्षांचा संसार मोडला, पतीने घटस्फोटाबाबत सोडलं मौन; म्हणाला, “आम्ही दोघेही आता…”
अभिषेक बच्चन आणि बंटी वालिया जयपूर पिंक पँथर्सचे सह-मालक आहेत. २०१४ मध्ये या संघाने प्रो कबड्डीमध्ये खेळायला सुरुवात केली. अभिषेक बच्चनच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास अभिनेता शेवटचा ‘घूमर’ चित्रपटात दिसला होता. येत्या काही दिवसांत अभिषेक बच्चन ‘हेरा फेरी ३’, ‘द बिग बुल २’ आणि ‘बी हॅप्पी’मध्ये दिसणार आहे.