Amitabh Bachchan Post: महानायक अमिताभ बच्चन सोशल मीडियावर खूप सक्रिय आहेत. ते त्यांच्या ब्लॉगवर, एक्स अकाउंटवर पोस्ट शेअर करत असतात. आता त्यांनी खोट्या बातम्या पसरवणाऱ्यांना खडे बोल सुनावले आहेत. स्वतःमधील उणिवा लपवण्यासाठी हे लोक अशा खोट्या बातम्या पसरवतात, असं त्यांनी म्हटलं आहे. या लोकांना ते मूर्ख म्हणाले.
अमिताभ बच्चन यांनी रविवारी Tumblr या प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट शेअर केली. बिग बी यांनी लिहिलं, “मूर्ख आणि बिनडोक लोक. या जगात अशा लोकांची कमतरता नाही; ते स्वत:ची विवेकहीन आणि अर्धवट बुद्धी लपवण्यासाठी दररोज अशा बिनबुडाच्या गोष्टी तयार करतात आणि छापतात.” शेवटी त्यांच्या नेहमीच्या स्टाइलने ‘माय लव्ह’ असं लिहून त्यांनी ही पोस्ट संपवली.
हेही वाचा – Video: गर्दीत चाहत्याने आणलेली विठ्ठलाची मूर्ती पाहिली अन्…; अमिताभ बच्चन यांच्या प्रतिक्रियेचं होतंय कौतुक
अमिताभ यांनी त्यानंतर एक्सवर (पूर्वीचे ट्विटर) एक पोस्ट केली. या पोस्टमध्ये त्यांनी लिहिलं, “जे प्रत्येक शब्दाचा स्वतःचा अर्थ काढतात, ते त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील अनर्थ लपवत असतात.” या पोस्टमध्ये त्यांनी हसणारा इमोजी वापरला.
अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्या नात्यात दुरावा आला असून ते घटस्फोट घेणार आहेत, अशा चर्चा गेले काही महिने सातत्याने होत आहेत. याच दरम्यान अमिताभ बच्चन यांनी खोटी माहिती पसरवणाऱ्यांवर टीका केली आहे. अमिताभ बच्चन यांच्या या पोस्ट सध्या खूप चर्चेत आहेत.
दुसरीकडे सोशल मीडियावर काही फोटो समोर आले आहेत, ज्यात अभिषेक व ऐश्वर्या दोघेही एकत्र दिसत आहेत. एका लग्नाच्या रिसेप्शनमध्ये या जोडप्याने हजेरी लावली होती. या फोटोत ऐश्वर्या रायची आई वृंदा रायदेखील होत्या. तसेच नोव्हेंबर महिन्यात अभिषेक व ऐश्वर्या यांनी मुलगी आराध्याचा १३ वा वाढदिवस एकत्र साजरा केला; मात्र ऐश्वर्याने शेअर केलेल्या फोटोत अभिषेक बच्चन नव्हता.
हेही वाचा – रेखा अमिताभ बच्चन यांच्या ‘कौन बनेगा करोडपती’ शोबद्दल म्हणाल्या, “मला विचार…”
अमिताभ बच्चन सध्या ‘कौन बनेगा करोडपती’ हा शो होस्ट करत आहेत. या शोमध्ये ते स्पर्धकांना प्रश्न विचारण्याबरोबरच त्यांच्याशी विविध विषयांवर गप्पा मारतात. तसेच ते त्यांच्या आयुष्यातील अनेक जुने किस्सेही या शोमध्ये शेअर करत असतात.