२००१ साली प्रदर्शित झालेला ‘एक रिश्ता: द बॉन्ड ऑफ लव्ह’ हा चित्रपट मोठ्या चर्चेत होता. या चित्रपटात अमिताभ बच्चन(Amitabh Bachchan), अक्षय कुमार, करिश्मा कपूर, राखी आणि जुही चावला हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसले होते. बीग बी या चित्रपटाचा कसा भाग झाले, याबद्दल दिग्दर्शक सुनील दर्शन यांनी खुलासा केला आहे.

अमिताभ बच्चन यांनी फोन करून मागितलेले काम

सुनील दर्शन यांनी ‘रेडिओ नशा’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी म्हटले, “एक दिवस मी माझ्या अंधेरीतील ऑफिसकडे कारने चाललो होतो, त्यावेळी मला एक फोन आला. जेव्हा मी तो फोन उचलला, त्यावेळी पलीकडून येणारा आवाज ऐकून माझ्या अंगावर काटा आला होता. फोनवर मी ऐकले, “हॅलो सुनील, मी अमिताभ बोलतोय.” जसे मी ते ऐकले, लगेच मी गाडी बाजूला घेतली. अमिताभ बच्चन पुढे म्हणाले, “मी ऐकले आहे की तुम्ही चित्रपट बनवत आहात, मला त्या चित्रपटाचा भाग बनणे आवडेल. जर माझ्यासाठी कोणती भूमिका असेल, तर प्लीज मला कळवा.” अमिताभ बच्चनसारखा व्यक्ती भूमिकेसाठी विचारतोय, हे ऐकल्यानंतर मी थक्क झालो. मी जाऊन त्यांना चित्रपटाची कथा सांगितली. त्यानंतर त्यांनी मला स्क्रीप्ट मागितली. त्यांनी चित्रपटाची तयारी सुरू केली. अशा प्रकारे अमिताभ बच्चन या चित्रपटाचा भाग बनले.”

अक्षय कुमार, जुही चावला, करिश्मा कपूर आणि अमिताभ बच्चन हे कलाकार फायनल झाले. मात्र, आईच्या भूमिकेसाठी अजून कोणाची निवड झाली नव्हती. हेमा मालिनी हा सुनील दर्शन यांचा पहिला पर्याय होता. मात्र, त्यामध्ये यश मिळाले नाही. त्यानंतर त्यांनी दिग्गज अभिनेत्री राखी यांना या भूमिकेसाठी विचारले.

याविषयी बोलताना सुनील दर्शन यांनी म्हटले, “चित्रपटात आईची भूमिका साकारण्यासाठी मी राखी यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी भूमिका करण्यास होकार दिला, पण माझ्यासमोर एक अट ठेवली. त्या म्हणाल्या, मी रात्री ८:४५ ते १०:१५ पर्यंत काम करणार नाही. मी या १.५ तासांत काम करणार नाही. उपलब्ध राहणार नाही, त्यामुळे तुमचे वेळापत्रक त्यानुसार तयार करा. मी त्यांना विचारले, काय समस्या आहे? त्यांनी म्हटले, “मला कौन बनेगा करोडपती’ पाहायचे आहे.

“मी अमिताभ बच्चन यांच्याकडे गेलो आणि त्यांना हे सांगितले. त्यावर अमिताभजींनी म्हटले, “त्यांना नकार देऊ नका. मी माझे वेळापत्रक बदलेन. ९-६ मी करणसाठी काम करतो. तुमच्याकडे मी ७ वाजता येईन, त्यानंतर २ वाजेपर्यंत शूटिंग करेन. राखीजींच्या व्हॅनमध्ये टीव्ही आणि केबलची व्यवस्था करा, म्हणजे त्या आनंदाने शो बघू शकतील आणि त्यानंतर शूट करतील”, अशी आठवण सुनील दर्शन यांनी सांगितली आहे.

हेही वाचा: या आठवड्यात OTT वर बघा हटके कथांसह जबरदस्त अ‍ॅक्शन, कॉमेडी आणि थ्रिलर कंटेन्ट, वाचा यादी

अमिताभ बच्चन यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव सांगताना सुनील दर्शन यांनी म्हटले, “चित्रपटाचे शूटिंग झाल्यानंतर त्यांनी मला म्हटले होते, जेव्हा तुला कधी संधी मिळेल, तेव्हा माझ्यासाठी चित्रपट बनव.”

दरम्यान, सुनील दर्शन आणि अमिताभ बच्चन यांनी पुन्हा एकत्र काम केले नाही. मात्र, दिग्दर्शकाने अभिषेक बच्चनबरोबर ‘हाँ मैंने भी प्यार किया’ या चित्रपटात एकत्र काम केले आहे.