Amitabh Bachchan becomes one of India’s highest taxpayers : बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन हे भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात दिग्गज अभिनेत्यांपैकी एक आहेत. मागील सहा वर्षांपासून ते इंडस्ट्रीत काम करत आहेत. ८२ वर्षांचे अमिताभ बच्चन या वयातही अनेक चित्रपटांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारत आहेत. ते शेवटचे ‘कल्की एडी 2898’ मध्ये अश्वत्थामाच्या भूमिकेत झळकले होते. हा चित्रपट २०२४ मधील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांपैकी एक होता. या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची तयारी सुरू आहे. याचदरम्यान अमिताभ बच्चन यांच्या उत्पन्नाबद्दल मोठी माहिती समोर आली आहे.

पिंकव्हिलाच्या एका रिपोर्टनुसार, अमिताभ बच्चन यांनी २०२४-२५ या आर्थिक वर्षात तब्बल १२० कोटी रुपये कर भरला आहे. वर्षभरातील त्यांची एकूण कमाई ३५० कोटी रुपये होती. त्यांनी चित्रपट, ब्रँड एंडोर्समेंट्स आणि ‘कौन बनेगा करोडपती’ होस्ट करून ही कमाई केली आहे. ते वयाच्या ८२ व्या वर्षी सिनेविश्वात सर्वाधिक कमाई करणाऱ्या व्यक्तींपैकी एक ठरले आहेत.

बिग बी यांनी १५ मार्च २०२५ रोजी २०२४-२५ या आर्थिक वर्षातील शेवटची अॅडव्हान्स टॅक्स इन्स्टॉलमेंट म्हणून तब्बल ५२.५० लाख रुपये भरले. अमिताभ बच्चन वेळेवर कर भरतात, हे त्यांच्या या कृतीतून दिसून येत आहे.

अमिताभ बच्चन आता शाहरुख खानला मागे टाकून सर्वाधिक कर भरणारे सेलिब्रिटी ठरले आहेत. मागच्या वर्षी, शाहरुखने अंदाजे ९२ कोटी रुपये कर भरला होता. पण यंदा अमिताभ यांनी तब्बल १२० कोटी रुपये कर भरून शाहरुखला मागे टाकलं आहे.

‘कौन बनेगा करोडपती’ मध्ये दिसणार नाहीत अमिताभ बच्चन?

अमिताभ बच्चन यांच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास ते छोट्या पडद्यावर ‘कौन बनेगा करोडपती’ होस्ट करण्यासाठी ओळखले जातात. या क्विझ रिअॅलिटी शोच्या आगामी पर्वाचे होस्ट म्हणून अमिताभ बच्चन दिसणार नाही अशा चर्चा काही दिवसांपूर्वी होती. त्यांची जागा या शोमध्ये शाहरुख खान किंवा त्यांची सून ऐश्वर्या राय बच्चन घेणार असल्याचं म्हटलं जात होतं. पण अमिताभ बच्चन यांनी स्वतःच पोस्ट करून या चर्चांना पूर्णविराम दिला. तसेच ‘कौन बनेगा करोडपती’च्या आगामी पर्वात होस्ट म्हणून परतण्याचं आश्वासन चाहत्यांना दिलं.