बॉलीवूडमध्ये ज्या कलाकारांचे महत्त्वाचे योगदान आहे, त्यामध्ये अमिताभ बच्चन(Amitabh Bachchan) यांचे नाव अग्रस्थानी घेतले जाते. संपूर्ण जगभरात त्यांचा चाहतावर्ग आहे. ८०-९० च्या दशकात ‘अँग्री यंग मॅन’ अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. आजही ते चित्रपटांत प्रमुख भूमिका साकारत प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसतात. २०२४ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘कल्की: २८९८ एडी’ या चित्रपटात त्यांनी साकारलेल्या भूमिकेचे सर्व स्तरांतून कौतुक होताना दिसले. त्यानंतर त्यांनी वैट्टेयन या चित्रपटात प्रसिद्ध अभिनेते रजनीकांत यांच्याबरोबर स्क्रीन शेअर केली होती. बिग बी त्यांच्या व्यावसायिक आयुष्याबरोबर त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळेदेखील मोठ्या चर्चेत असतात. आता त्यांनी जमीन खरेदी केली असल्याचे समोर आले आहे. त्यांनी ती जमीन कुठे खरेदी केली हे जाणून घेऊ…
‘टाइम्स ऑफ इंडिया’नुसार हरिवंशराय बच्चन ट्रस्टने अयोध्येत ५४,४५४ स्क्वेअर फूट जमीन खरेदी केली आहे. ही जमीन राम मंदिरापासून १० किलोमीटर अंतरावर आहे. या जमिनीचा वापर प्रतिष्ठित हिंदी कवी व अमिताभ बच्चन यांचे वडील हरिवंश राय बच्चन यांच्या जीवन आणि साहित्यिक योगदानाला समर्पित करणारे स्मारक स्थापन करण्यासाठी केला जाऊ शकतो, असे म्हटले जात आहे. हरिवंश राय बच्चन मेमोरियल ट्रस्टच्या वतीने राजेश ऋषिकेश यादव यांनी हा व्यवहार केला आहे. ‘मनी कंट्रोल’नुसार या जमिनीची किंमत सुमारे ८६ लाख आहे.
२०१३ मध्ये अमिताभ बच्चन यांनी ‘हरिवंश राय बच्चन मेमोरियल ट्रस्ट’ची स्थापना केली आहे. गेल्या वर्षी राम मंदिराच्या उद्घाटनापूर्वी, अमिताभ बच्चन यांनी १६ जानेवारी रोजी हवेली अवध येथे ४.५४ कोटी रुपयांना ५,३७२ चौरस फूट जमीन खरेदी केली होती. आता बच्चन कुटुंबाने दुसऱ्यांदा अयोध्येत जमिनीचा व्यवहार केला आहे.
अमिताभ बच्चन काही दिवसांपासून त्यांच्या एका सोशल मीडियावरील पोस्टमुळे चर्चेत होते. त्यांनी सोशल मीडियावर जाण्याची वेळ झाली, असे लिहिले होते. त्यानंतर त्यांच्या या पोस्टचा नेमका अर्थ काय, असा अनेकांना प्रश्न पडला होता. ते अभिनयातून निवृत्ती घेणार की कौन बनेगा करोडपती हा शो सोडणार, अशा अनेक चर्चा होताना दिसल्या होत्या. मात्र, अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या पोस्टवर स्पष्टीकरण देत ते निवृत्ती घेत नसल्याचे स्पष्ट केले होते.