बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन नेहमी चर्चेत असतात. आपल्या कारकिर्दीत त्यांनी अनेक सुपरहिट चित्रपट दिले. वयाच्या ८१ व्या वर्षातही ते अभिनय क्षेत्रात कार्यरत आहेत. अमिताभ बच्चन यांच्या अभिनय कारकिर्दीला नुकतीच ५५ वर्षे पूर्ण झाली आहेत. या ५५ वर्षांत त्यांनी वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिका साकारल्या. दरम्यान, एआयने त्यांच्या ५५ वर्षांच्या अभिनय प्रवासाचा लेखाजोखा सादर केला आहे,
अमिताभ बच्चन सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय आहेत. दररोज निरनिराळे फोटो व व्हिडीओ शेअर करत ते चाहत्यांना अपडेट देत असतात. दरम्यान नुकतचं त्यांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात त्यांनी एआयकडून बनवण्यात आलेला त्यांचा एक फोटो शेअर केला आहे. एआयने अमिताभ बच्चन यांच्या ५५ वर्षाच्या अभिनयाच्या कारकिर्दीवर आधारित फोटो बनवला आहे. यामध्ये अमिताभ बच्चन यांचे डोके कॅमेरे आणि फिल्म प्रोडक्शन मशीनने भरलेले दिसून येत आहे. हा फोटो शेअर करत त्यांनी लिहिले ‘चित्रपटाच्या अद्भुत जगात ५५ वर्षे. AI ने मला याचा तपशील दिला आहे’. बिग बींची ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे अनेकानी या पोस्टवर कमेंट केल्या आहेत. तसेच सिनेसृष्टीत ५५ वर्षे पूर्ण केल्याबद्दल अनेकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
अमिताभ बच्चन यांनी १९६९ साली प्रदर्शित झालेल्या ‘भुवन शोम’ या चित्रपटातून मनोरंजन क्षेत्रात पदार्पण केले. या चित्रपटासाठी त्यांनी व्हॉइस आर्टिस्ट म्हणून काम केले होते. त्यानंतर प्रदर्शित झालेल्या ‘सात हिंदुस्थानी’ चित्रपटातून त्यांनी अभिनयाला सुरुवात केली. मात्र, त्यांना खरी ओळख मिळाली ती १९७१ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘आनंद’ चित्रपटातून. या चित्रपटात त्यांनी साकारलेली डॉक्टर भास्कर अर्थात बाबू मोशाय हे पात्र चांगलेच गाजले. ‘जंजीर’ चित्रपटात त्यांनी साकारलेल्या तडफदार पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेमुळे त्यांना अँग्री यंग मॅन’ म्हणून ओळख मिळाली. त्यांच्या शोले, ‘दीवार’, ‘अमर अकबर अँथनी, ‘मिस्टर नटवरलाल’ ‘लावारिस’, ‘मुकद्दर का सिकंदर’ या चित्रपटांनी प्रेक्षकांना वेड लावले होते.
हेही वाचा- लेक ईशा देओलच्या घटस्फोटावर धर्मेंद्र यांनी पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया; म्हणाले, “त्या दोघांनी…”
बिग बींच्या कामकाजाबद्दल बोलायचे झाले, तर लवकरच त्यांचा ‘कल्की एडी २८९७’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात त्यांच्याबरोबर साऊथचा सुपरस्टार कमल हासन व प्रभास यांच्या प्रमुख भूमिका आहेत. तसेच दीपिका पदुकोण व दिशा पटानी याही या चित्रपटात झळकणार आहेत. पौराणिक कथेवर आधारित असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन नाग अश्विन यांनी केले आहे. हा चित्रपट याच वर्षी प्रदर्शित होणार आहे.