अमिताभ बच्चन यांचा बॉलीवूडमधला प्रवास हा अत्यंत प्रेरणादायी आणि संघर्षपूर्ण आहे. करिअरच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी अनेक अपयशांचा सामना केला. त्यांचे सुरुवातीचे चित्रपट यशस्वी ठरले नाहीत. मात्र, १९७३ साली आलेल्या ‘जंजीर’ चित्रपटाने त्यांना एका रात्रीत सुपरस्टार बनवले. यशाच्या शिखरावर असतानाही अमिताभ बच्चन यांना आर्थिक संकटाचा मोठा फटका बसला. त्यांची अमिताभ बच्चन कॉर्पोरेशन लिमिटेड (ABCL) ही निर्मिती संस्था (प्रॉडक्शन हाऊस) दिवाळखोरीत गेली आणि जवळपास ९० कोटी रुपयांचे कर्ज त्यांच्यावर झाले. याकाळात अभिषेक बच्चनला शिक्षण अर्धवट सोडावे लागले.
रणवीर अलाहाबादियाला दिलेल्या एका मुलाखतीत अभिषेक बच्चनने त्या काळाच्या आठवणी सांगितल्या. अभिषेक म्हणाला, “मी बोस्टन युनिव्हर्सिटीत लिबरल आर्ट्स आणि परफॉर्मिंग आर्ट्सचे शिक्षण घेत होतो. परंतु, माझे वडील आर्थिक संकटात असताना मी त्यांच्याबरोबर असणे हे माझे कर्तव्य आहे, असं मला वाटलं. मी तिथे बसून राहू शकत नव्हतो, जेव्हा त्यांना कुटुंबाचा खर्च चालविण्यासाठी त्यांच्या स्टाफकडून पैसे घेण्याची वेळ आली होती. तेव्हा मी बाबांना फोन करून सांगितले, ‘बाबा, मला वाटते की, मी शिक्षण सोडून परत यावं आणि तुमच्याबरोबर राहावं.”
हेही वाचा…आजीच्या विरोधामुळे ‘या’ अभिनेत्रीने देव आनंद यांना दिलेला नकार, नंतर आयुष्यभर राहिलेला पश्चाताप
अमिताभ बच्चन यांनीही एका मुलाखतीत, “तो माझ्या ४४ वर्षांच्या करिअरमधला सर्वांत अंधकारमय काळ होता. कर्जदार आमच्या घराच्या दारात येत, आणि कर्जाच्या वसुलीसाठी धाक दाखवत असत. त्या काळात त्यांनी आमच्या ‘प्रतीक्षा’ या घरावर जप्ती आणण्याची धमकी दिली होती,” या शब्दांत मन विदीर्ण करणारा अनुभव कथन केला.
रजनीकांत यांनी सांगितली होती अमिताभ यांच्या संघर्षमय दिवसांची आठवण
‘वेट्टैयन’ चित्रपटाच्या ऑडिओ लाँचच्या वेळी सुपरस्टार रजनीकांत यांनी अमिताभ बच्चन यांच्या संघर्षाची आठवण सांगितली. “अमिताभजींना आर्थिक संकटामुळे मुंबईतील जुहू येथील घर आणि इतर मालमत्ता विकावी लागली. एकदा ते यश चोप्रांच्या घरी चालत गेले. कारण- त्यांच्याकडे ड्रायव्हर ठेवण्यासाठी पैसे नव्हते. यशजींनी त्यांना मदतीसाठी धनादेश दिला; पण अमिताभजींनी तो धनादेश फक्त काम दिल्यास स्वीकारू, असे सांगितले. त्यानंतर त्यांना ‘मोहब्बते’ मिळाला आणि त्याच वेळी ‘कौन बनेगा करोडपती’ (KBC)देखील मिळाला,” असे रजनीकांत यांनी सांगितले.
हेही वाचा…विद्या बालनने ‘भूल भुलैय्या २’ चित्रपटाला ‘या’ कारणामुळे दिलेला नकार, निर्मात्यांनी केला खुलासा
त्या काळात अमिताभजींनी कोणतेही काम करण्यात कमीपणा मानला नाही. अनेक जाहिराती केल्या. काही लोक त्यांच्यावर हसले; परंतु त्यांनी तीन वर्षे १८ तास काम करीत सर्व कर्ज फेडले. इतकेच नव्हे, तर त्यांनी आपले जुने घरही परत विकत घेतले आणि त्या परिसरात आणखी दोन घरे विकत घेतली. आज ८२ व्या वर्षीदेखील ते दररोज १० तास काम करतात. अमिताभ बच्चन नुकतेच नाग अश्विन यांच्या ‘कल्की २८९८ AD’मध्ये अश्वत्थाम्याच्या भूमिकेत दिसले.