Amitabh Bachchan Hospitalized to Kokilaben Hospital: महानायक अमिताभ बच्चन यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना मुंबईतल्या कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन हे दोघंही स्ट्रिट प्रीमियर लीगच्या फायनल्सना गुरुवारी ठाण्यात उपस्थित होते. दादोजी कोंडदेव मैदान या ठिकाणी ही स्पर्धा पार पडली. आता अमिताभ बच्चन यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. आज सकाळी सहा वाजता मुंबईतल्या कोकिलाबेन रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलं. त्यांची अँजिओप्लास्टी झाल्याची माहिती आहे. जनसत्ताने या विषयीचं वृत्त दिलं आहे.
भास्कर डॉट.कॉम ने दिलेल्या माहितीनुसार अमिताभ बच्चन यांना आज सकाळी ६ च्या सुमारास कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यानंतर त्यांची अँजिओप्लास्टी पार पडली. अमिताभ बच्चन यांच्यावर अँजिओप्लास्टी पार पडली का? हे अद्याप बच्चन कुटुंबापैकी कुणीही सांगितलेलं नाही.
अँजिओप्लास्टी कधी केली जाते?
एखाद्या रुग्णाला जर हृदयविकाराचा झटका आला तर अँजिओप्लास्टी केली जाते. हृदयाच्या आर्टरीजमध्ये ब्लॉक तयार होतात, त्यामुळे रक्ताभिसरण क्रियेत अडथळे निर्माण होतात. अशा स्थितीत अँजिओप्लास्टीचा सल्ला दिला जातो.
अमिताभ बच्चन यांची पोस्ट
खुद्द अमिताभ बच्चन यांनी पोस्ट करत आता प्रकृती स्थिर असल्याची माहिती चाहत्यांनी दिली आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अमिताभ बच्चन यांच्या प्रकृतीची चर्चा रंगली आहे. बिग बी पोस्ट करत म्हणाले, ‘कायम कृतज्ञ…’ बिग बींच्या पोस्टवर चाहते लाईक्स आणि कमेंट करत प्रेम व्यक्त करत आहेत. अमिताभ बच्चन यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे चाहत्यांचे आभार व्यक्त केलं आहे. बिग बींची प्रकृती आता स्थिर असल्याची माहिती आहे. आमिताभ बच्चन यांच्या पोस्ट करत कमेंट करत चाहते त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करताना दिसत आहेत.
अमिताभ बच्चन कायम सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असतात. बिगी बी त्यांच्या आयुष्यातील चांगल्या वाईट घटना सोशल मीडिया आणि ब्लॉगच्या माध्यमातून चाहत्यांपर्यंत पोहोचवत असतात. बिग बी कायम त्यांच्या खासगी आणि प्रोफशेनल आयुष्यामुळे चर्चेत असतात.