Manoj Kumar Passes Away: ‘दस नंबर’, ‘क्रांती’, ‘रोटी, कपडा और मकान’, ‘पूरब और पश्चिम’ यांसारखे अनेक हिट चित्रपट देणारे दिग्गज अभिनेते व दिग्दर्शक मनोज कुमार आज ( ५ एप्रिल ) पंचत्वात विलीन झाले. ४ एप्रिलला मनोज कुमार यांनी वयाच्या ८७व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. मुंबईतील कोकिलाबेन धीरूबाई अंबानी रुग्णालयात उपचारादरम्यान मनोज यांचं निधन झालं. त्यानंतर आज जुहू येथील पवनहंस स्मशानात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी बॉलीवूडच्या अनेक कलाकारांनी उपस्थिती लावून मनोज कुमार यांना शेवटचा निरोप दिला. अमिताभ बच्चन, राजपाल यादव, सुभाष घई, सलीम खान, अरबाज खान, अभिषेक बच्चन असे बरेच बॉलीवूडचे कलाकार मनोज यांच्या अंत्यसंस्कारासाठी पोहोचले होते. यादरम्यानचा अमिताभ बच्चन व सलीम खान यांच्या एका व्हिडीओने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
सेलिब्रिटी फोटोग्राफर ‘विरल भयानी’च्या इन्स्टाग्राम पेजवर अमिताभ बच्चन व सलीम खान यांचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये अरबाज खान वडील सलीम खान यांच्या हाताला पकडून मनोज कुमार यांच्या अंत्यसंस्कारासाठी नेताना दिसत आहे. सलीम खानच्या या दुसऱ्या बाजूला सिक्युरिटी गार्डने त्यांचा हात पकडला आहे. याच वेळी मागून अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन जात असतात. तेव्हा अमिताभ बच्चन यांचं लक्ष सलीम खान यांच्याकडे जात. सलीम यांना पाहताच अमिताभ लगबगीने पुढे जातात आणि त्यांना भेटतात.
अमिताभ बच्चन सलीम खान यांना भेटताना, बाजूच्या सिक्युरिटी गार्डला बाजूला करतात. मग ते सलीम खान यांचा हात धरून त्यांची विचारपूस करतात आणि शेवटी अमिताभ सलीम यांना मिठी मारताना दिसत आहेत. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला आहे.
दरम्यान, अमिताभ बच्चन यांच्या कारकिर्दीतील सुपरहिट चित्रपट सलीम आणि जावेद या जोडीने लिहिले होते. यात ‘दीवार’, ‘डॉन’, ‘जंजीर’ यांसारख्या चित्रपटांचा समावेश आहे. एवढंच नव्हेतर अमिताभ यांना मोठा ब्रेक देण्याचं श्रेयदेखील सलीम आणि जावेद या जोडीला जातं. याबाबत जावेद अख्तर यांनी एका मुलाखतीमध्ये म्हटलं होतं की, ‘जंजीर’ चित्रपटासाठी अमिताभ यांचं नाव त्यांनी सुचवलं होतं. कारण एंग्री मॅनचा लूक ‘बॉम्बे टू गोवा’ चित्रपटातील एका सीनमध्ये पाहायला होता. सलीम-जावेद या जोडीमुळेच अमिताभ यांना ‘जंजीर’ चित्रपट मिळाला होता.