“हम जहाँ खडे होते है लाईन वहीसे शूरु होती है” असं म्हणत भारतीय चित्रपटसृष्टीतील सगळे मापदंड मोडीत काढणारे अमिताभ बच्चन आज ८० वर्षाचे झाले. भारतीय चित्रपटसृष्टीतील त्यांचं योगदान हे अतुलनीय आहे. केवळ भारतातच नव्हे तर जगभरात या नावाला जे वलय प्राप्त झालं आहे ते पाहून थक्क व्हायला होतं. असा महानायक शतकातून एकदाच होतो हे अगदी तंतोतंत खरं आहे.
बच्चन यांनी त्यांच्या ‘अँग्री यंग मॅन’च्या प्रतिमेतून सामान्यांना अन्यायाशी दोन हात करायचं धाडस दिलं. पण तुम्हाला माहितीये का की एकेकाळी हॉलिवूडच्या बॅटमॅन, सुपरमॅनप्रमाणेच बच्चन यांनी कॉमिक बुक्सच्या विश्वातही धमाल आणली होती. ऐकून खरं वाटणार नाही, पण बच्चन यांचं स्वतंत्र कॉमिकही प्रचंड लोकप्रिय झालो होतं. त्याकाळी बच्चन यांच्या चित्रपटाच्या सेटवर त्यांना भेटायला चाहत्यांची तुडुंब गर्दी व्हायची. ‘पुकार’ चित्रपटाच्या गोव्यातील सेटवर रणधीर कपूर यांनी अमिताभ बच्चन यांच्यासाठी जमा झालेली गर्दी पाहून त्यांना एक नाव दिलं ते नाव म्हणजे, ‘सुप्रीमो’. बच्चन यांना दिलेलं हे नाव एका मासिकाचे संपादक पम्मी बक्षी यांना प्रचंड आवडलं आणि या नावाचं त्यांनी कॉमिक बुक काढायचं ठरवलं.
आणखी वाचा : “बाळासाहेब आणि शिवसेनेमुळेच आज मी…” अमिताभ बच्चन यांनी सांगितला ‘तो’ हृदयद्रावक किस्सा
बिग बी यांनाही ती संकल्पना आवडली आणि या कॉमिक बुकसाठी लेखक म्हणून गुलजार यांना पाचारण करण्यात आलं. शिवाय अमर चित्र कथामधील लोकप्रिय चित्रकार प्रताप मलिक यांच्यावर चित्रांची जबाबदारी सोपवण्यात आली आणि १९८० मध्ये ‘एडवेंचर ऑफ अमिताभ’ या नावाने हे कॉमिक प्रकाशित केलं गेलं. या कॉमिक बुकमध्ये अमिताभ यांचा अवतार खुपच वेगळा होता, त्यांना लाल रंगाचे कपडे आणि डोळ्यावर मोठा गॉगल असा एक सुपरहीरोसारखा लुक देण्यात आला होता. शिवाय यामध्ये त्यांचे मित्र विजय आणि अॅंथनी यांच्या मैत्रीची गोष्ट उलगडली होती.
या कॉमिकला उत्तम प्रतिसाद मिळाला पण नंतर मात्र हे कॉमिक प्रकाशित व्हायचं बंद झालं. बच्चन यांच्या ‘अँग्री यंग मॅन’ या प्रतिमेला अगदी साजेसं हे पात्र तयार करण्यात आलं होतं. अमिताभ यांना पुन्हा त्याचा अॅक्शन स्वरूपात पाहण्यासाठी आजही त्यांचे चाहते उत्सुक आहेत. त्यांच्या या कॉमिकमधील प्रयोगाबद्दल वाचून बच्चन यांना मोठ्या पडद्यावर नाही तर निदान या कॉमिकमधून पुन्हा त्यांच्या मूळ अवतारात दिसतील अशी आशा त्यांचे चाहते नक्कीच करतील.