बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्या अभिनयाचे आजही लाखो चाहते आहेत. अमिताभ बच्चन यांनी एकेकाळी बॉलिवूड गाजवलं होतं. त्यांच्या करिअरबरोबरच अनेकदा त्यांचं खासगी आयुष्यही चर्चेत राहिलं होतं. खासकरून त्यांचं नाव रेखा यांच्याशी जोडलं गेल्यानंतर त्यांच्या नावाची चर्चा बरीच चर्चा झाली. पण त्याआधी अमिताभ बच्चन यांचं लग्न जया बच्चन यांच्याशी झालं होतं. जया बच्चन आणि अमिताभ बच्चन यांच्या लग्नाला आता ४९ वर्षे झाली आहेत. अशात केबीसीच्या नुकत्याच प्रसारित झालेल्या एका एपिसोडमध्ये अमिताभ बच्चन यांनी जया यांच्याशी लग्न करण्याचं कारण स्पष्ट केलं आहे.
जया बच्चन आणि अमिताभ बच्चन यांना बॉलिवूडची परफेक्ट जोडी मानलं जातं. अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांनी ३ जून १९७३ मध्ये लग्न केलं होतं. पुढच्या वर्षी अमिताभ बच्चन आणि जया बच्चन लग्नाचा ५० वा वाढदिवस साजरा करणार आहेत. लग्नाच्या जवळपास ५० वर्षांनंतर अमिताभ बच्चन यांनी जया बच्चन यांच्याशी लग्न करण्याचं कारण सांगितलं आहे.
आणखी वाचा- …आणि अमिताभ बच्चन पहिल्यांदा हॉटसीटवर बसले, ‘केबीसी’मधला गंमतीशीर व्हिडीओ पाहिलात का?
बिग बी यांनी ‘कौन बनेगा करोडपती’च्या नुकत्याच प्रसारित झालेल्या एका एपिसोडमध्ये लग्नाबाबत खुलासा केला आहे. सोनी टीव्हीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये अमिताभ बच्चन यांनी समोर बसलेल्या महिलेच्या केसांचं कौतुक करताना दिसतात. याच व्हिडीओमध्ये ते सांगतात की जया बच्चन यांच्याशी त्यांनी लग्नही त्यांच्या लांब केसांमुळे केलं होतं. अमिताभ बच्चन म्हणतात, “मी माझ्या पत्नीशी लग्न यासाठी केलं होतं कारण तिचे केस खूप लांब होते.”
आणखी वाचा- समांथाचा ‘यशोदा’ अमिताभ बच्चन यांच्या ‘उंचाई’वर पडला भारी; बॉक्स ऑफिसवर करतोय जबरदस्त कमाई
दरम्यान अमिताभ बच्चन आणि जया बच्चन बॉलिवूडमधील एक आदर्श जोडी मानली जाते. ‘जंजीर’ चित्रपटात जया आणि अमिताभ यांनी एकत्र काम केलं होतं आणि हा चित्रपट हीट झाल्यानंतर या दोघांनी लग्न केलं होतं. अमिताभ बच्चन यांच्या कामाबद्दल बोलायचं तर त्यांचा ‘ऊंचाई’ हा चित्रपट काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला आहे. सूरज बडजात्या दिग्दर्शित हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर खूप चांगली कामगिरी करत आहे. या चित्रपटाची कथा मैत्रीवर आधारित आहे. चित्रपटाने आतापर्यंत १३.९४ कोटी एवढा गल्ला जमवला आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्याबरोबरच अनुपम खेर आणि बोमन इराणी यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.