महानायक अमिताभ बच्चन आज वयाच्या ८२ व्या वर्षीही कार्यरत आहेत. सिनेमाच्या शूटिंगला वेळेआधी सेटवर जाणं, त्यांचं कामाप्रति समर्पण याबाबतचे अनेक किस्से प्रसिद्ध आहेत. त्याचप्रमाणे अमिताभ बच्चन हे निर्व्यसनी आहेत आणि या त्यांच्या चांगल्या सवयींची त्यांच्या चाहत्यांनाही माहिती आहे. मात्र, या महानायकानं एकेकाळी दिवसाला २०० सिगारेट ओढल्या होत्या. खुद्द बिग बींनीच एका जुन्या मुलाखतीत याबाबतचा खुलासा केला होता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

फार कमी लोकांना माहीत आहे की, एक काळ असा होता जेव्हा अमिताभ बच्चन व्यसनांच्या आहारी गेले होते. सध्या सोशल मीडियावर १९८० साली ‘इंडिया टुडे’ला दिलेली त्यांची ही मुलाखत प्रचंड व्हायरल होत आहे. या मुलाखतीत अमिताभ यांनी धूम्रपान, मद्यपान आणि मांसाहार यासंबंधीचा आपला अनुभव मोकळेपणानं सांगितला होता.

हेही वाचा…“ती पद्धत म्हणजे बालिशपणा…”, शाहरुख खानने आमिर खानवर केलेली टीका; अभिनेत्याने दिलेलं असं उत्तर की…

एकेकाळी मांसाहारी होते बिग बी

१९८० साली दिलेल्या त्या मुलाखतीत अमिताभ बच्चन सांगतात, “मी पूर्वी मांसाहारी होतो; पण पुढे जाऊन मी ही सवय सोडली. त्यामागे कुठलंही धार्मिक कारण नव्हतं. फक्त मला मांसाहाराची चव आवडत नसे म्हणून मी शाकाहारी झालो. माझे वडील शाकाहारी होते; तर आई मांसाहारी होती. जयासुद्धा मांसाहारी आहे. परदेशांत गेल्यावर मात्र शाकाहारी जेवण मिळविण्यात मला अडचण येते.”

दिवसाला २०० सिगारेट्स आणि मद्यपान

त्या मुलाखतीत अमिताभ बच्चन यांनी मांसाहाराबरोबरच दारू आणि सिगारेटच्या व्यसनाबद्दलही सांगितलं. ते म्हणतात, “कलकत्त्यात असताना मी दिवसाला २०० सिगारेट ओढत होतो. होय, बरोबर ऐकलंत, २०० सिगारेट! पण मुंबईत आल्यावर मी ते सोडून दिलं. मी दारूही प्यायचो, जे मिळेल ते प्यायचो. पण काही वर्षांपूर्वी मला जाणवलं की, मला याची खरंच गरज नाही. म्हणून मी या सर्व सवयी सोडल्या.”

हेही वाचा…हृतिक रोशन-सबा आझादच्या नात्याला ३ वर्षे पूर्ण, अभिनेत्याच्या ‘त्या’ पोस्टवर पूर्वाश्रमीची पत्नी कमेंट करत म्हणाली…

अमिताभ बच्चन लवकरच सुपरस्टार रजनीकांत यांच्या आगामी ‘वेट्टैयन’ चित्रपटात झळकणार आहेत. हा चित्रपट अमिताभ बच्चन यांच्या ११ ऑक्टोबरच्या वाढदिवशी प्रदर्शित होणार आहे. १९९१ मध्ये आलेल्या ‘हम’नंतर रजनीकांत आणि अमिताभ बच्चन पुन्हा एकत्र काम करीत आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amitabh bachchan opens up about his past smoking and drinking habits psg