अमिताभ बच्चन सोशल मीडियावर खूप सक्रिय आहेत. ते अनेकदा सोशल मीडियावर फोटो व व्हिडीओ शेअर करत असतात. आता त्यांनी सोशल मीडियावर केलेली पोस्ट चांगलीच चर्चेत आहे. ही पोस्ट २०२४ मध्ये भारताने गमावलेल्या चार व्यक्तींबद्दल आहे. हा फोटो शेअर करून बिग बी यांनी जे कॅप्शन लिहिले, ते पाहून अनेक युजर्स व्यक्त झाले आहेत.
अमिताभ बच्चन यांनी सरत्या वर्षाला निरोप देणारी एक पोस्ट केली. २०२४ मध्ये उद्योगपती रतन टाटा, चित्रपट निर्माते श्याम बेनेगल, तबला वादक झाकीर हुसेन आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग या दिग्गजांचे निधन झाले. व्यंगचित्रकार सतीश आचार्य यांनी या सर्वांवर एक व्यंगचित्र काढलं. ते अमिताभ बच्चन यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केलं.
अमिताभ बच्चन यांनी शेअर केलेली पोस्ट काय?
अमिताभ बच्चन यांनी शेअर केलेल्या या व्यंगचित्रात दिवंगत रतन टाटा, चित्रपट निर्माते श्याम बेनेगल, तबला वादक झाकीर हुसैन आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे फोटो आहेत आणि त्यावर २०२४ मध्ये एक पारशी, एक मुस्लीम, एक शीख आणि एका हिंदूचे निधन झाले आणि पूर्ण देश हळहळला. सर्वांनी त्यांचे एक भारतीय म्हणून स्मरण केले, असा मजकूर लिहिलेला आहे. हा फोटो शेअर करत ‘हे चित्र सगळं सांगतंय,’ असं बिग बींनी लिहिलं.
हेही वाचा – “खोटं बोलून, माझं नाव वापरून…”, अंकिता प्रभू वालावलकर भडकली; म्हणाली, “आमच्या लग्नासाठी…”
नेटकरी करतायत बिग यांच्या पोस्टचं कौतुक
बिग बी यांनी मध्यरात्री तीन वाजता ही पोस्ट शेअर केली. त्यांच्या पोस्टचे लोक खूप कौतुक करत आहेत. आपण सगळे एक आहोत ही प्रेरणा या पोस्टमधून मिळते, अशी कमेंट एका युजरने केली. तर, ही पोस्ट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद, असं एका युजरने लिहिलं. तुमच्या या पोस्टमधून लोक काहीतरी बोध घेतील, अशी आशा आहे, अशी कमेंट एका युजरने केली.