सध्या सोशल मीडियावर लक्षद्वीप विरुद्ध मालदीव या विषयावरून जोरदार वाद सुरू आहे. महानायक अमिताभ बच्चनही मालदीवच्या मंत्र्यांनी भारताच्या आत्मनिर्भरतेवर केलेल्या टीकेमुळे खूश नाहीत. त्यांनीही या वादावर पोस्ट करत लक्षद्वीपच्या सुंदर ठिकाणांचं कौतुक केलं आहे. त्यांनी एक्सवर पोस्ट करत लक्षद्वीप बेटांचे कौतुक केले आणि भारतीय पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी आपला पाठिंबा दर्शविला.
रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लक्षद्वीप दौऱ्याबद्दल आणि भारतातील लोकांबद्दल अपमानास्पद टिप्पणी केल्याबद्दल मालदीव सरकारने तीन मंत्र्यांना निलंबित केलं आहे. लक्षद्वीपच्या भेटीबद्दल पंतप्रधानांनी एक्सवर पोस्ट केली. त्यावर मालदीवच्या तीन मंत्र्यांनी टीका केली आणि केंद्रशासित प्रदेशाला मालदीवचे पर्यायी पर्यटन स्थळ करण्याचा हा प्रयत्न होता, असं म्हटलं होतं. त्यानंतर सगळा वाद सुरू झाला.
बिपाशा बासूने पती अन् मुलीसह मालदीवमध्ये साजरा केला वाढदिवस, वादादरम्यान फोटो आले समोर
या वादानंतर सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर पोस्ट करत लक्षद्वीप पर्यटनाचं कौतुक केलं. तसेच अनेक भारतीयांना मालदीवचे तिकिट्स आणि हॉटेल बूकिंग रद्द केले. याच दरम्यान माजी क्रिकेटपटू विरेंद्र सेहवागने एक पोस्ट केली होती. “उडुपीचे सुंदर समुद्रकिनारे असोत, पोंडीतील पॅराडाईज बीच, अंदमानमधील नील आणि हॅवलॉक बीच असो वा आपल्या देशभरातील इतर अनेक सुंदर समुद्रकिनारे असोत, भारतामध्ये अशी अनेक ठिकाणे आहेत जी पायाभूत सुविधांच्या मदतीने आपण आणखी सुंदर करता येऊ शकतात. मालदीवच्या मंत्र्यांनी आपल्या देशाबद्दल आणि आपल्या पंतप्रधानांबद्दल केलेले विधान हे आपण भारतातील ही ठिकाणं पर्यटकांसाठी आकर्षक बनवण्यासाठी आणि आपल्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी एक उत्तम संधी आहे,” अशी पोस्ट सेहवागने केली होती. ही पोस्ट अमिताभ बच्चन यांनी शेअर केली आहे.
“विरू पाजी.. हे खूप समर्पक आहे आणि आपल्याच भूमीबद्दल योग्य भावनेशी अनुरूप आहे. मी लक्षद्वीप आणि अंदमानला गेलो आहे आणि ती अप्रतिम व सुंदर ठिकाणं आहेत.. सुंदर बीचेस आणि अंडरवॉटर अनुभव तर अविश्वसनीय आहेत. आम्ही भारत आहोत, आम्ही आत्मनिर्भर आहोत, आमच्या आत्मनिर्भरतेवर गदा आणू नका, जय हिंद” असं अमिताभ बच्चन यांनी सेहवागची पोस्ट शेअर करत लिहिलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या लक्षद्वीप दौऱ्यानंतर मालदीवचा तीळपापड; मंत्र्यांचे वादग्रस्त विधान
लक्षद्वीप बेटांवरील पर्यटनाला चालना देणार्या पंतप्रधान मोदींच्या पोस्टमुळे मालदीवचे राजकारणी, सरकारी अधिकारी आणि भारतीय सोशल मीडिया युजर्स यांच्यात चांगलाच वाद पेटला आहे. पंतप्रधान मोदींच्या भेटीनंतर लगेचच अनेक बॉलीवूड सेलिब्रिटी समोर येत लक्षद्वीप पर्यटनाला पाठिंबा देत आहे. या सेलिब्रिटींमध्ये सलमान खान, श्रद्धा कपूर, रणवीर सिंग, जॉन अब्राहम आणि रणदीप हुडा, जान्हवी कपूर यांचा समावेश आहे.