बॉलीवूडचे महानायक अशी ज्यांची ओळख आहे ते अभिनेते म्हणजे अमिताभ बच्चन(Amitabh Bachchan) होय. अमिताभ बच्चन वयाच्या ८२ व्या वर्षीदेखील तितक्याच उत्साहाने काम करताना दिसतात. चित्रपटांत तितक्याच ताकदीच्या भूमिका साकारताना दिसतात. सध्या ते कौन बनेगा करोडपती या शोचे सूत्रसंचालन करत आहेत. कौन बनेगा करोडपतीच्या मंचावर ते अनेकदा किस्से सांगताना दिसतात. महत्वाचे म्हणजे, त्यांनी सांगितलेल्या किस्से प्रेक्षकांना प्रचंड आवडत असल्याचे दिसते. आता त्यांनी या मंचावर १९७६ साली प्रदर्शित झालेल्या ‘कभी कभी’ चित्रपटाच्या एक किस्सा सांगितला आहे.
अमिताभ बच्चन काय म्हणाले?
‘कौन बनेगा करोडपती’च्या मंचावर एका स्पर्धकाशी बोलताना अमिताभ बच्चन यांनी म्हटले, “दीवार चित्रपटाचे शूटिंग चालू होते. दीवार असा चित्रपट होता, ज्यामध्ये मारामारी, भांडणे यामुळे अॅक्शन सीन होते. त्याच्या दोन दिवसानंतर ‘कभी कभी’ चित्रपटाच्या शूटिंगसाठी काश्मिरला जायचे होते. एकदम रोमँटिक झाडे, फूले, डोंगर असं सगळं होतं. मला सुरूवातीला थोडे विचित्र वाटले. अचानक कुठून कुठे आलो आहोत, असे वाटत होते. दोनच दिवस होते, त्यामुळे चित्रपटात मी कोणते कपडे घालणार आहे याबद्दल यश चोप्रांना विचारले. तर त्यांनी मला सांगितले की जे काही तुझ्याकडे घरात कपडे असतील ते घेऊन ये. ते सगळे चांगले दिसतील. त्या चित्रपटात माझे जितके कपडे पाहिले असतील ते माझे स्वत:चे आहेत.”
‘दीवार’ चित्रपटानंतर यश चोप्रांचा ‘कभी कभी’ हा असा दुसरा चित्रपट होता, ज्यामध्ये ते अमिताभ बच्चन यांच्याबरोबर काम करत होते. ‘दीवार’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर मोठे यश मिळवले होते. ‘कभी कभी’ या चित्रपटालादेखील मोठे यश मिळाले. महत्वाचे म्हणजे या चित्रपटांतील गाणीदेखील खूप गाजली. ‘कभी कभी मेरे दिल में’, ‘मैं पल दो पल का शायर हूँ’, ‘तेरे चेहरे से’, ही गाणी आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. या गाण्यांची लोकप्रियता आजही टिकून असल्याचे दिसते.
अमिताभ बच्चन यांच्या कामाबद्दल बोलायचे तर ते ‘कल्की: २८९८ एडी’ या चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसले होते. या चित्रपटातील त्यांनी साकारलेल्या भूमिकेचे सर्व स्तरातून कौतुक झाले. या चित्रपटात प्रभास, दीपिका पादुकोण हे कलाकारदेखील प्रमुख भूमिकेत होते.
अभिनयाबरोबरच अमिताभ बच्चन व त्यांचे कुटुंब खासगी आयुष्यामुळेदेखील मोठ्या चर्चेत आहे. बॉलीवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय व अभिषेक बच्चन यांच्या नात्याची बराच काळ मोठी चर्चा झाल्याचे पाहायला मिळाले. बच्चन कुटुंब व ऐश्वर्या राय यांच्या नात्यात दुरावा आला असून अभिनेत्री वेगळी राहते, असेही म्हटले जात होते. अनंत अंबानीच्या लग्नात बच्चन कुटुंबाने एकत्र हजेरी लावली मात्र ऐश्वर्या व तिची लेक आराध्या मात्र वेगळ्या आल्या. त्यामुळे या चर्चा मोठ्या वेगाने पसरल्या. मात्र, त्यांच्या नात्यावर ऐश्वर्या किंवा अभिषेक यांनी कोणतेही स्पष्टीकरण दिले नाही. काही दिवसांपूर्वीच एका कार्यक्रमात ते एकत्र दिसले होते. त्यामुळे घटस्फोटांना चर्चांना त्यांनी उत्तर दिल्याचे म्हटले जात होते.