मनोरंजनसृष्टीत असे काही कलाकार आहेत की, ज्यांची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढताना दिसते. संपूर्ण जगभरात अशा कलाकारांचा चाहतावर्ग असतो. अमिताभ बच्चन आणि रजनीकांत यांची गणना अशा कलाकारांमध्ये होते. आता वेट्टैयन या चित्रपटात दोन दिग्गज कलाकारांना एकत्र पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे. मात्र, अमिताभ बच्चन यांनी रजनीकांत यांच्याविषयी ३३ वर्षांपूर्वीचा सांगितलेला किस्सा सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘वेट्टैयन’ या चित्रपटाचा एक कार्यक्रम नुकताच चेन्नईमध्ये पार पडला. या कार्यक्रमाला अमिताभ बच्चन हजर राहू शकले नाहीत; मात्र त्यांनी या निमित्ताने खास संदेश पाठवला होता. १९९१ मधील एका चित्रपटात रजनीकांत आणि गोविंदा यांनी अमिताभ बच्चन यांच्या लहान भावांची भूमिका निभावली होती. त्याची आठवण बिग बींनी सांगितली.

‘इंडिया टुडे’ने दिलेल्या माहितीनुसार, अमिताभ बच्चन यांनी ‘वेट्टैयन’ या चित्रपटात काम करणे ही सन्मानाची बाब असल्याचे म्हटले. कारण- हा त्यांचा पहिला तमीळ चित्रपट असल्याचे त्यांनी पाठविलेल्या संदेशात म्हटले. त्याबरोबरच त्यांनी मुकुल आनंद दिग्दर्शित ‘हम’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानचा किस्सादेखील शेअर केला.

काय म्हणाले अमिताभ बच्चन?

अमिताभ बच्चन यांनी म्हटले, ” ‘हम’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान ब्रेकमध्ये मी माझ्या एसी गाडीमध्ये आराम करायचो. मात्र, रजनीकांत बाहेर जमिनीवर झोपायचा. त्याचा हा साधेपणा बघितल्यानंतर मीदेखील गाडीतून बाहेर आलो आणि बाहेरच आराम केला”, अशी आठवण बिग बींनी या व्हिडीओ मेसेजमध्ये सांगितली आहे. त्याबरोबरच रजनीकांत यांचे कौतुक करीत अमिताभ बच्चन यांनी त्यांना ‘नायकांचे नायक’, असेही म्हटले आहे.

‘अंधा कानून’ व ‘गिरफ्तार’ या चित्रपटांतदेखील या दोन दिग्गज कलाकारांची जोडी पाहायला मिळाली होती. अमिताभ बच्चन आणि रजनीकांत यांच्यातील मैत्री वर्षानुवर्षे टिकून आहे. त्यांच्या मैत्रीचे चाहते कौतुक करताना दिसतात.

‘वेट्टैयन’ या चित्रपटाचे दिग्दर्शन टी. जे. ज्ञानवेल यांनी केले आहे. याआधी त्यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘जय भीम’ या चित्रपटाने मोठा धुमाकूळ घातला होता. हा चित्रपट प्रेक्षकांच्याही पसंतीस उतरला होता. या चित्रपटात अभिनेता सूर्या मुख्य भूमिकेत दिसला होता. आता वेट्टैयन हा चित्रपट १० ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अमिताभ बच्चन आणि रजनीकांत यांच्याबरोबरच या चित्रपटात फहाद फासिल, राणा दग्गुबाती, मंजू वॉरियर, रितिका सिंग, दुशरा विजयन व व्ही. जे. रक्षा हे कलाकारदेखील महत्त्वाच्या भूमिकांत दिसणार आहेत.

हेही वाचा: “वर्षा ताईंना मी ओळखत नव्हते” निक्की तांबोळीचं अजब वक्तव्य ऐकून सगळेच चक्रावले; म्हणाली, “आता त्यांच्याबद्दल…”

अमिताभ बच्चन यांच्या कामाविषयी बोलायचे झाल्यास ते नुकतेच ‘कल्की : २८९८ एडी’ या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसले होते. त्यांच्या भूमिकेचे सर्व स्तरांतून कौतुक झाल्याचे पाहायला मिळाले. आता ते ‘कौन बनेगा करोडपती’च्या १६ व्या सीझनचे सूत्रसंचालन करीत आहेत. अनेकदा बिग बी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळेदेखील चर्चेत असतात.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amitabh bachchan reveals that rajinikanth slept on the floor between shooting breaks 33 years ago hum movie nsp