अभिनेत्री रेखा आणि अमिताभ बच्चन यांची जोडी पहिल्यांदा ४७ वर्षांपूर्वी म्हणजे १९७६ मध्ये ‘दो अनजाने’ चित्रपटातून एकत्र दिसली. तर १९८१ मध्ये प्रदर्शित झालेला ‘सिलसिला’ हा त्यांचा अखेरचा चित्रपट ठरला. या चित्रपटानंतर या दोघांनी कधीच एकत्र काम केलं नाही. पण आजही या जोडीचे असंख्य चाहते आहेत. या दोघांच्या पहिल्याच चित्रपटाच्या वेळी रेखा यांना अमिताभ बच्चन यांच्या रागाला सामोरं जावं लागलं होतं.
अमिताभ बच्चन आता ८० वर्षांचे आहेत. तरीही त्यांचा उत्साह तरूण कलाकारांना लाजवणारा आहे. या वयातही ते चित्रपटसृष्टीत कार्यरत आहेत आणि विशेष म्हणजे ते शूटिंगसाठी नेहमीच वेळेत सेटवर हजर असतात. जेव्हा ‘दो अनजाने’चं शूटिंग सुरू होतं तेव्हाही अमिताभ बच्चन आपल्या सवयीप्रमाणे वेळेत सेटवर यायचे तर दुसरीकडे काही कलाकार मात्र वेळेत येतच नसत. ज्यात रेखा यांच्याही नावाचा समावेश होता.
आणखी वाचा- अमिताभ बच्चन यांच्यावर प्रेम होतं का? प्रश्नावर रेखा म्हणाल्या होत्या, “मला आजपर्यंत असा पुरुष…”
जेव्हा रेखा पहिल्यांदाच अमिताभ बच्चन यांच्याबरोबर काम करत होत्या तेव्हा अमिताभ यांना रेखा यांच्या एका सवयीचा प्रचंड वैताग आला होता. ते म्हणजे रेखा यांचं सेटवर उशिरा येणं. एकीकडे अमिताभ वेळेत सेटवर पोहोचायचे तर दुसरीकडे रेखा नेहमीच उशिरा यायच्या. असं हे काही दिवस सुरूच राहिलं. अमिताभ यांना रेखा यांची ही सवय अजिबात आवडत नव्हती आणि एक दिवस त्यांनी रागाच्या भरात रेखा यांनी उशिरा येण्याबद्दल चांगलंच सुनावलं.
आणखी वाचा- रेखा यांचं नाव ऐकून भडकले होते अमिताभ बच्चन, सर्वांसमोर केला होता पत्नी जया यांचा अपमान
यासिर उस्मान यांचं पुस्तक ‘रेखा: द अनटोल्ड स्टोरी’नुसार रेखा उशीरा सेटवर पोहोचल्यानंतर अमिताभ त्यांच्याकडे गेले आणि त्यांना स्पष्ट शब्दात ताकीद दिली की, त्यांनी शूटिंगवर वेळेत यावं आणि कामाकडे गांभीर्याने पाहावं. अमिताभ बच्चन यांच्या रागाचा पारा चढलेला पाहून काही क्षण तर रेखा हैराण झाल्या. पण नंतर त्यांना आपल्या चुकीची जाणीव झाली.
अमिताभ यांनी ताकीद दिल्यानंतर रेखा सेटवर पुन्हा कधीच उशीरा पोहोचल्या नाहीत. एवढंच नाही तर असंही बोललं जातं की, अमिताभ यांचा तो अवतार बघून रेखा हैराण झाल्या होत्या कारण पहिल्यांदाच एका सहकलाकाराने रेखा यांना वेळेचं महत्त्व समजावलं होतं. पण नंतर मात्र रेखा यांना अमिताभ यांचा हा अंदाज आवडला. त्या यावर इम्प्रेस झाल्या होत्या. त्यानंतर त्या कधीच कामाच्या ठिकाणी उशिरा पोहोचल्या नाहीत.