ऐश्वर्या राय व अभिषेक बच्चन यांच्या नात्यात दुरावा आल्याच्या चर्चांना गेल्या काही दिवसांपासून उधाण आलं आहे. ऐश्वर्याने बिग बींचं घर सोडल्याच्याही बातम्या आल्या होत्या. तसेच अमिताभ बच्चन यांनी सूनबाईंना इन्स्टाग्रामवर अनफॉलो केल्याचं म्हटलं जात होतं. अशातच आता बच्चन कुटुंब एकत्र दिसलं आहे. त्यांचा एक व्हिडीओ समोर आला आहे.
शुक्रवारी मुंबईत आराध्या बच्चनच्या शाळेच्या कार्यक्रमात अमिताभ बच्चन, ऐश्वर्या राय, अभिषेक बच्चन आणि अगस्त्य नंदा यांनी हजेरी लावली. अभिषेक व ऐश्वर्याच्या घटस्फोटाच्या चर्चा होत असताना बच्चन कुटुंबाचा हा व्हिडीओ पाहून चाहते आनंद व्यक्त करत आहेत. धीरुबाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये आराध्याच्या अॅन्युअल प्रोग्रामसाठी बच्चन कुटुंब एकत्र आले होते.
या कार्यक्रमाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत काळ्या रंगाच्या सलवारमध्ये ऐश्वर्या खूपच सुंदर दिसत होती. त्याबरोबर तिने काळी व गोल्डन ओढणी घेतली होती. दुसरीकडे अभिषेकने निळ्या रंगाचं शर्ट घातलं होतं. तर अमिताभ प्रिंटेड ब्लॅक जॅकेटमध्ये स्टायलिश दिसत होते. या कार्यक्रमात अभिषेक व ऐश्वर्या एकत्र एकाच कारने आल्याचं पाहायला मिळालं. ऐश्वर्याची आई वृंदा रायदेखील तिथे उपस्थित होत्या.
व्हिडीओत दिसतंय की ऐश्वर्या अगस्त्यचे कौतुकाने गाल ओढते. त्यानंतर बिग बी तिथे येतात, ते ऐश्वर्याच्या आईला नमस्कार करतात व त्यांच्याशी बोलतात. नंतर ते सगळे तिथून निघतात. वृंदा राय व बिग बी पुढे जातात, तर अभिषेक व ऐश्वर्या त्यांच्यामागे एकत्र जातात. यावेळी ती अभिषेक व अमिताभ यांच्याशी बोलताना दिसते.
सव्वा कोटींचे घड्याळ, लाखोंचा ड्रेस अन्…, कियारा अडवाणीने या लूकसाठी खर्च केले ‘इतके’ रुपये
दरम्यान, अभिषेक व ऐश्वर्याच्या घटस्फोटाच्या सध्या तरी फक्त चर्चाच आहेत. दोघांनी याबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. यापूर्वी संपूर्ण बच्चन कुटुंब अगस्त्य नंदाच्या ‘द आर्चीज’ चित्रपटाच्या प्रिमिअरसाठी एकत्र आलं होतं. बच्चन व नंदा कुटुंबियांनी एकत्र पोज दिल्या होत्या. त्यांचे फोटो चांगलेच चर्चेत होते.