अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्या ८० च्या दशकातील चित्रपटांतील भूमिकांमुळे त्यांना ‘अँग्री यंग मॅन’ ही ओळख मिळाली. त्यांच्या चित्रपटांत मोठ्या प्रमाणात ॲक्शन सीन पाहायला मिळत असत. काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेला ‘कल्की: २८९८ एडी’ या चित्रपटातदेखील अमिताभ बच्चन ॲक्शन सीन करताना दिसले आहेत. मात्र, काही दशकांपूर्वी अमिताभ बच्चन यांची चित्रपटाच्या सेटवरील ‘सगळं होऊन जाईल’ या वृत्तीबद्दल तक्रार होती. सेटवरील सुरक्षिततेवर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. ‘खाकी’ चित्रपटात ऐश्वर्या रायला दुखापत झाली होती. यासंदर्भात बोलताना त्यांनी अशा काम करण्याच्या पद्धतीवर नाराजी व्यक्त केली होती. ऐश्वर्या त्यावेळी बच्चन कुटुंबाचा भाग नव्हती, मात्र ज्या पद्धतीने ऐश्वर्याचा अपघात झाला, ते पाहिल्यानंतर अमिताभ बच्चन यांना झोप लागली नव्हती, असे त्यांनी एका मुलाखतीत म्हटले होते.

“तिच्या पाठीवर निवडुंगाच्या…”

अमिताभ बच्चन यांनी २००३ ला ‘रेडिफ’ला मुलाखत दिली होती. यावेळी त्यांनी ‘खाकी’ चित्रपटाच्या शूटिंगवेळची आठवण सांगितली होती. त्यांनी म्हटले होते, “आम्ही नाशिकबाहेर एका रस्त्यावर खाकी चित्रपटाचे शूटिंग करत होतो. स्टंटमॅनने खूप वेगाने कार चालवली, त्याचा वेग सुमारे ६०, ७० किलोमीटर ताशी इतका होता. ती गाडी घसरली. आम्ही सर्व जण लगेच तिथून बाजूला झालो. मात्र, ऐश्वर्या राय आणि तुषार कपूरला तितक्या वेगाने हालचाल करता आली नाही. गाडीने तिच्या खुर्चीला धडक दिली आणि ऐश्वर्याला खाली दरीत नेले. अक्षय कुमारने तप्तरता दाखवत तिला बाहेर काढले, मात्र तिच्या पाठीवर सगळीकडे जखमा झाल्या होत्या. तिचा पाय फ्रॅक्चर झाला होता, ते संपूर्ण दृश्य भयानक होते.”

याबद्दल पुढे बोलताना त्यांनी म्हटले, “मी ऐश्वर्याच्या आईला विचारले की तिला मुंबईला परत घेऊन जायचे आहे का? त्यानंतर अनिल अंबानी यांच्या खासगी विमानाने तिला परत मुंबईला घेऊन जायचे असे ठरवले. नाशिकमध्ये नाईट लँडिंगची सोय नसल्याने तेथील मिलिटरी तळावर हे विमान उतरवण्यासाठी आम्हाला दिल्लीवरून परवानगी घ्यावी लागली.”

“हे सगळं माझ्या डोळ्यासमोर घडलं. तिच्या पाठीवर निवडुंगाच्या काट्यांचे ओरखडे होते. तिच्या पायाच्या मागच्या बाजूचे हाड तुटले होते. तिला खूप जखमा झाल्या होत्या. ते पाहिल्यानंतर मला झोप लागली नव्हती”, अशी आठवण सांगत त्यांनी सेटवरील सुरक्षिततेच्या प्रोटोकॉलवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.

हेही वाचा: Video: सिद्धार्थ जाधव लवकरच येतोय धिंगाणा घालायला; ‘आता होऊ दे धिंगाणा’चं तिसरं पर्व कधीपासून सुरू होणार जाणून घ्या…

दरम्यान, ऐश्वर्या राय आणि अमिताभ बच्चन यांचा मुलगा अभिनेता अभिषेक बच्चन यांनी २००७ साली लग्नगाठ बांधली. २०११ ला ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चनला एक मुलगी झाली, तिचे नाव आराध्या असे आहे. ती आई ऐश्वर्याबरोबर कार्यक्रमांना हजेरी लावताना दिसते. नुकतीच या मायलेकीच्या जोडीने पॅरिस फॅशन वीकमध्येदेखील हजेरी लावलेली दिसली.