बॉलीवूडचे कलाकार सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. कधी आपल्या चित्रपटातील भूमिकांमुळे, कधी सोशल मीडियावरील पोस्टमुळे, तर कधी मुलाखतीदरम्यान केलेल्या वक्तव्यामुळे हे कलाकार चर्चांचा भाग बनतात. आता बॉलीवूूडमध्ये ज्यांची ओळख महानायक अशी आहे, त्यांनी लिहिलेल्या ब्लॉगमुळे ते चर्चेत आले आहेत.
काय म्हणाले अमिताभ बच्चन?
अमिताभ बच्चन यांनी ब्लॉगमध्ये स्वातंत्र्यदिनादिवशी कुटुंबाबरोबर चांगला वेळ घालवल्याचे म्हटले आहे. ते लिहितात, “गेले काही दिवस स्टुडिओमध्ये खूप काम होते, व्यग्र होतो. आजचा स्वातंत्र्य दिन शांततेने व्यतीत केला. आज काही वेळ मी माझ्या कुटुंबाबरोबर चांगला घालवला. काम खूप असल्याने असा एखादा दिवसच मिळतो, जो मी माझ्या कुटुंबाबरोबर घालवू शकतो, माझ्या आरोग्यावर लक्ष देऊ शकतो, आराम करू शकतो. काही कामं राहिली असतील तर ती पूर्ण करू शकतो. सध्या स्टुडिओमध्ये खूप व्यग्र असल्याने येणाऱ्या दिवसांत मी माझे वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवन यामध्ये समतोल साधू शकेन, मी जे काही ठरवलं आहे ते पूर्ण करू शकेन, अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे.”
पुढे त्यांनी प्रेक्षकांकडून मिळणाऱ्या प्रतिसादाबद्दल लिहिले आहे की, या क्षेत्रामध्ये प्रेक्षकांचे प्रेम आणि प्रतिसाद खूप महत्त्वाचा आहे. त्यांनी दिलेले मत, केलेली टीका-टिप्पणी यामुळे कायमच त्यांच्याप्रति जबाबदारी वाढते, असे अमिताभ बच्चन आपल्या पोस्टमध्ये लिहितात.
हेही वाचा: Video: जान्हवी किल्लेकरच्या ‘त्या’ कृतीवर घरातील सदस्यांची प्रतिक्रिया; म्हणाले, “मीठ-मसाला….”
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून बच्चन कुटुंब अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन यांच्यामुळे चर्चेत आहे. ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आल्याचे पाहायला मिळाले होते. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नात अभिषेक बच्चनने आपल्या संपूर्ण कुटुंबासोबत ग्रँड एन्ट्री केल्याचे पाहायला मिळाले होते; तर ऐश्वर्या रायने मुलगी आराध्या बच्चन हिच्यासोबत हजेरी लावल्याचे पाहायला मिळाले होते. यानंतर ऐश्वर्या राय आणि बच्चन यांच्या कुटुंबात काहीतरी बिनसले असल्याचे म्हटले जात होते. मात्र, अभिषेक बच्चनने नुकतेच या अफवा असल्याचे म्हटले होते.
अमिताभ बच्चन यांच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास ते नुकतेच ‘कल्की:२८९८ एडी’ या चित्रपटात काम करताना दिसले. या चित्रपटातील त्यांच्या भूमिकेचे मोठे कौतुक झाल्याचे पाहायला मिळाले. सध्या ‘कौन बनेगा करोडपती’च्या १६ व्या पर्वाचे सूत्रसंचालन ते करत असल्याचे दिसत आहे.