बॉलीवूडचे महानायक म्हणून ओळखले जाणारे अभिनेते अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) सतत कोणत्या ना कोणत्या गोष्टींमुळे चर्चेत असतात. सध्या ते कौन बनेगा करोडपती या लोकप्रिय शोचे सूत्रसंचालन करताना दिसत आहेत. या कार्यक्रमात ते प्रेक्षकांबरोबर अनेक गोष्टी, किस्से शेअर करत असतात. तसेच ते तंत्रज्ञानाबरोबर स्वत:ला अद्ययावत ठेवताना दिसतात. आता नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘कौन बनेगा करोडपती’च्या एका भागामध्ये बिग बींनी त्यांना जर गॅजेटसंबंधी काही प्रश्न पडले असतील, तर ते त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींना मदतीसाठी बोलावतात. त्यांची नातवंडे, तसेच मुलगा अभिषेक यांची ते मदत घेतात, असे म्हटले आहे.
काय म्हणाले अमिताभ बच्चन?
‘कौन बनेगा करोडपती’ या शोमध्ये एका स्पर्धकाबरोबर बोलताना अमिताभ बच्चन यांनी म्हटले, “आपल्याला एखादा प्रश्न पडला, तर त्याच वेळी आपल्याला उत्तर पाहिजे असते. तुम्ही सगळे या गोष्टीशी सहमत असाल की, ज्या काही समस्या येतात, त्या रात्री १२-१ नंतरच येतात. त्यावेळी कोणाला उठवायचे, काय करायचे हा प्रश्न पडलेला असतो. पण, मीसुद्धा आता हुशार झालो आहे. मी अशा लोकांना निवडलं आहे, जे ३ वाजण्याआधी झोपतच नाहीत. मी अशा लोकांना निवडले आहे, जे कुटुंबातच आहेत. नात-नातू आहेत. अभिषेक आहे. हे सगळे गुणी व ज्ञानी लोक आहेत आणि मला त्यांच्याकडून जाणून घ्यायचे असते की, तुम्हाला हे सगळं कसं माहीत होतं? मला का हे येत नाही? ते मला म्हणतात, “तुमचे वय झाले आहे. तुम्ही घरी बसा”, हा किस्सा सांगताना अमिताभ बच्चन हसताना दिसत आहेत. पुढे त्यांनी स्पर्धकाला म्हटले, “मी यासाठी हे म्हणत आहे की, जाण्याआधी तुमचा मोबाईल नंबर मला द्या. रात्री १२-१ वाजता जर तुम्हाला उचकी आली, तर समजा मी तुमची आठवण काढत आहे. “त्यावर बिग बींसमोर बसलेल्या स्पर्धकानेदेखील मीसुद्धा रात्री ३ वाजेपर्यंत जागा असतो”, असे म्हटल्याचे व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.
अमिताभ बच्चन हे अशा काही कलाकारांमधील एक आहेत, जे दररोज त्यांच्या चाहत्यांबरोबर ब्लॉगद्वारे संपर्कात राहतात. त्यांच्या ब्लॉगमध्ये नमूद केलेल्या वेळेमुळे ते उशिरा झोपतात, हे चाहत्यांना माहीत आहे. अनेकदा चाहते त्यांच्या तब्येतीसाठी त्यांना वेळेवर झोपण्याची विनंती करतात. या ब्लॉगमध्ये अमिताभ बच्चन अनेक फोटोदेखील शेअर करताना दिसतात. एप्रिल २००८ पासून ते ब्लॉग लिहितात आणि तेव्हापासून दररोज ते चाहत्यांबरोबर काही ना काही शेअर करताना दिसतात. या ब्लॉगद्वारे अनेकदा अमिताभ बच्चन त्यांच्या चाहत्यांना वाढदिवसाला शुभेच्छा देताना दिसतात.
हेही वाचा: नागा चैतन्य दुसऱ्यांदा अडकला विवाहबंधनात! लग्नातील पहिला फोटो आला समोर, सोभिताच्या लूकने वेधलं लक्ष
दरम्यान, बच्चन कुटुंब हे गेल्या काही दिवसांपासून ऐश्वर्या व अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाच्या अफवांमुळे चर्चेत आहे.