सध्या राजकारण आणि अभिनय या दोन्ही गोष्टींमध्ये फरक करणं कठीण झालं असलं तरी एक काळ असा होता जेव्हा या दोन्ही क्षेत्रातील लोकांचे एकमेकांशी अगदी सलोख्याचे संबंध होते. देशाची आर्थिक राजधानी मुंबई आणि चित्रपटसृष्टीची पाळंमुळंही मुंबईत त्यामुळे राजकारण आणि चित्रपटसृष्टी यांच्यातले संबंध आधी फार चांगले होते.
याच मुंबई आणि महाराष्ट्राच्या राजकारणातील दिग्गज व्यक्तिमत्त्व म्हणजेच हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचेदेखील कित्येक कलाकारांशी सलोख्याचे संबंध होते. बाळासाहेब स्वतः कलाकार असल्यामुळे ते कलाकारांचे महत्त्व ओळखून होते. भारतीय चित्रपटसृष्टीतील महानायक अमिताभ बच्चन हे बाळासाहेब यांचा प्रचंड आदार करतात, पदोपदी त्यांनी ही गोष्ट स्पष्ट केली आहे.
आणखी वाचा : आमिर खानची जाहिरात पाहून विवेक अग्निहोत्री म्हणाले, “असला काहीतरी मूर्खपणा…”
बाळासाहेबांमुळे मला जीवनदान मिळालं असंही बच्चन यांनी सांगितलं होतं. ठाकरे चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान अमिताभ यांनी हा किस्सा सांगितला. बच्चन म्हणाले, “कुलीच्या चित्रीकरणादरम्यान मला दुखापत झाली आणि मला तातडीने हॉस्पिटलमध्ये न्याव लागणार होतं, मुंबईत तेव्हा पावसामुळे वातावरण बिघडलं होतं आणि तेव्हा एकही रुग्णवाहिका यायला तयार नव्हती. अखेर बाळासाहेबांनी शिवसेनेची रुग्णवाहिका आली आणि मला वेळेवर हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं. ठाकरे परिवाराशी आमचे फार घनिष्ट संबंध आहेत. बाळसाहेबांमुळेच मला नवीन जीवन मिळालं आहे. आज त्यांच्यामुळेच मी जीवंत आहे.”
इतकंच नाही अमिताभ बच्चन यांनी लग्न केल्यानंतरही बाळासाहेबांनी अमिताभ आणि जया या दोघांचं चांगलंच आदरातिथ्य केलं होतं. शिवाय बाळासाहेबांनी अमिताभ यांना कठीण काळातही बरीच मदत केली होती. केवळ बच्चनच नाही तर संजय दत्तच्या संकटकाळात त्याच्या पाठीशी उभे राहणारेही बाळासाहेबच होते.