२३ सप्टेंबरला जेव्हा ‘जागतिक चित्रपट दिवस’ साजरा केला गेला तेव्हा संपूर्ण देशभरातून त्याला उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला. तिकीट दर कमी केल्याने लोकांनी बॉक्स ऑफिसवर चांगलीच गर्दी केली. ‘चूप’, ‘ब्रह्मास्त्र’सारख्या चित्रपटांना याचा चांगलाच फायदा झाला. चित्रपटक्षेत्राशी निगडीत असंच एक निमित्त साधून आता पुन्हा चित्रपटगृहांच्या मालकांनी तिकीट दर कमी करायचा निर्णय घेतला आहे. निमित्त आहे या दशकातील महानायक अमिताभ बच्चन यांचा वाढदिवस.

येत्या ११ ऑक्टोबरला अमिताभ बच्चन ही वयाची ८० वर्षं पूर्ण करणार असल्याकारणाने त्यांच्या लेटेस्ट ‘गुडबाय’ चित्रपटाच्या निर्मात्यांनी एक अनोखा निर्णय घेतला आहे. बॉलिवूड हंगामाच्या वृत्तानुसार मंगळावरी ११ ऑक्टोबरला अमिताभ बच्चन आणि रश्मिका मंदाना यांचा नुकताच प्रदर्शित झालेला ‘गुडबाय’ हा चित्रपट केवळ ८० रुपयांत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. बच्चन यांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्त हा अनोखा उपक्रम राबवणं खूप आनंददायी आहे असं चित्रपट निर्मात्यांनी स्पष्ट केलं आहे.

आणखी वाचा : “खूप शांतता…” ऋषी कपूर यांच्या आठवणीत नितू कपूर भावूक, पोस्ट चर्चेत

‘गुडबाय’ चित्रपटाचं आत्तापर्यंतच बॉक्स ऑफिसवर कलेक्शन चांगलं झालं असलं तरी ते आणखीन उत्तम करण्याची ही नवी संकल्पना आहे. शिवाय चित्रपटाला मिश्र प्रतिक्रिया मिळाल्यामुळे तिकीट दर कमी झाला तर नक्कीच प्रेक्षक चित्रपटगृहात गर्दी करतील आणि बच्चन यांचे चाहते नक्कीच या संधीचा लाभ घेतील अशी आशा चित्रपट निर्मात्यांनी व्यक्त केली आहे. पीव्हीआर, आयनॉक्स, सिनेपोलिस, मीराज अशा वेगवेगळ्या मल्टीप्लेक्सनी यात सहभाग घेतला आहेच शिवाय इतरही चित्रपटगृह यात लवकरच जोडली जातील असं वृत्तावरुन स्पष्ट होत आहे.

याबरोबरच पीव्हीआर येथे सुरू असलेल्या ‘बच्चन बॅक टू द बिगिनिंग’ या उपक्रमालाही प्रेक्षकांनी चांगलाच प्रतिसाद दिला आहे. ८ ऑक्टोबर ते ११ ऑक्टोबर या काळात बच्चन यांचे गाजलेले जून चित्रपट १७ शहरांमध्ये पुन्हा मोजक्या चित्रपटगृहात दाखवले जाणार आहेत. डॉन, काला पत्थर, कभी कभी, अशा वेगवेगळ्या चित्रपटांचा यात समावेश आहे. आता याचबरोबरीने बच्चन यांचा ‘गुडबाय’ चित्रपटही प्रेक्षकांना ८० रुपयांत पाहता येणार असल्याने बच्चन यांच्या चाहत्यांसाठी आणि तमाम सिनेरसिकांसाठी हा एक दुग्धशर्करा योगच आहे.

Story img Loader