बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन, बोमन इराणी, डॅनी डेन्झोंगपा, परिणीती चोप्रा आणि नीना गुप्ता यांच्या मुख्य भूमिका असलेल्या ‘ऊंचाई’ हा चित्रपट काल प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या घोषणेपासून प्रेक्षकांच्या मनात या चित्रपटाबद्दल खूप उत्सुकता होती. गेले अनेक दिवस ही सगळी कलाकार मंडळी विविध कार्यक्रमात या चित्रपटाच्या प्रमोशनच्या निमित्ताने झळकली. आता त्यांनी या चित्रपटासाठी घेतलेल्या मेहनतीचं फळ त्यांना मिळू लागलं आहे. नुकतीच या चित्रपटाच्या पहिल्या दिवशीच्या कमाईची आकडेवारी समोर आली आहे.
‘ऊंचाई’ या चित्रपटाची कथा आणि यातील कलाकारांचा दमदार अभिनय प्रेक्षकांना खुर्चीवर खिळवून ठेवण्यात यशस्वी झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. या चित्रपटाचे बजेट होते ४० कोटी. हा चित्रपट देशभरात ४८३ स्क्रीन्सवर दाखवला जात आहे. तर या चित्रपटाला एकूण १५०० शोज मिळाले आहेत.
आणखी वाचा : महेंद्रसिंग धोनी मोठ्या पडद्यावर पदार्पण करण्यासाठी सज्ज; ‘या’ चित्रपटात साकारणार महत्वपूर्ण भूमिका
अशात रिलीजच्या पहिल्याच दिवशी या चित्रपटाने १.६० कोटी ते १.८५ कोटीच्या घरात कमाई केल्याचे कळते. हा आकडा अमिताभ बच्चन यांच्या लॉकडाऊननंतर प्रदर्शित झालेल्या चित्रपटांच्या पहिल्या दिवशीच्या कमाईत सर्वात जास्त आहे.
हेही वाचा : KBC 14: चित्रपट विनामूल्य पाहता यावा यासाठी अमिताभ बच्चन करायचे ‘हे’ काम; बिग बींनी सांगितलं गुपित
लॉकडाऊननंतर अमिताभ बच्चन यांचे 3 चित्रपट प्रदर्शित झाले. त्यातील ‘चेहरे’ या चित्रपटाने पहिल्या दिवशी ४५ लाख, ‘गुडबाय’ने ९० लाख आणि ‘झुंड’ने १.१० कोटी कमाई केली होती. या चित्रपटांच्या मानाने ‘ऊंचाई’ने पहिल्या दिवशी खूप चांगली कमाई केली आहे. तसेच पुढील काही दिवसात हा चित्रपट आणखीन चांगली कमाई करू शकतो असे बोलले जात आहे. या चित्रपटात चार मित्रांची कथा दाखवण्यात आली आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शक सूरज बडजात्या यांनी केलं आहे.