बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन नेहमीच काहीतरी हटके करून आपल्या चाहत्यांचे मनोरंजन करीत असतात. चित्रपटसृष्टीत सर्वात दिग्गज असूनही बिग बी अमिताभ बच्चन कायम वेळेत सेटवर पोहोचण्यास प्राधान्य देतात. सध्या अमिताभ यांच्या ‘प्रोजेक्ट के’ या चित्रपटाचे मुंबईत शूटिंग सुरू आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : पूर्वाश्रमीच्या बॉयफ्रेंडबद्दल बोलताना उर्फी जावेदचा संताप, शिवीगाळ करत सांगितला ‘तो’ प्रसंग

मुंबईतील अनेक भागांत वाहतूककोंडीची समस्या निर्माण होत असल्याने अनेकदा नोकरदार वर्गाला कामावर पोहोचण्यास उशीर होतो. अगदी असाच अनुभव अमिताभ यांनाही आला. चित्रपटाच्या शूटिंगला वेळेत पोहोचण्यासाठी अमिताभ यांनी चक्क एका अनोळखी दुचाकीस्वाराकडे “सेटवर सोडतोस का?” विचारत मदत मागितली. या व्यक्तीच्या बाईकवर बसून ते सेटच्या दिशेने रवाना झाले. त्यानंतर फोटो शेअर करून संबंधित दुचाकीस्वाराचे अमिताभ यांनी आभार मानले आहेत.

हेही वाचा : विकी-साराने शेअर केले नव्या चित्रपटाचे पोस्टर; ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित, नेटकरी म्हणतात, “याची गाणी…”

अनोळखी व्यक्तीबरोबरच्या बाईक राईडचा फोटो शेअर करीत बिग बी लिहितात, “धन्यवाद मित्रा! तुझ्यामुळे मी सेटवर पोहोचू शकलो. मी तुला ओळखत नाही, पण तू मला मोठी मदत केली आहेस. ट्रॅफिकमधून मार्ग काढत तू मला वेळेत सोडलेस. मी तुझा आभारी आहे.” अमिताभ बच्चन यांनी शेअर केलेल्या फोटोवर त्यांच्या अनेक चाहत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. यामध्ये अनेक जणांनी, “मी तुम्हाला सोडायला रोज येत जाईन,” असे म्हटले आहे. तसेच काही जणांनी, “तुम्ही दोघांनीही हेल्मेट न घालता हा प्रवास केला…” असे सांगत बिग बी यांना वाहतुकीच्या नियमांची आठवण करून दिली आहे.

अमिताभ बच्चन त्यांच्या आगामी ‘प्रोजेक्ट के’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. या बहुचर्चित चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्यासह प्रभास आणि दीपिका पदुकोण मुख्य भूमिकेत दिसतील. १२ जानेवारी २०२४ रोजी मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर हा चित्रपट सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amitabh bachchan takes lift from stranger to avoid traffic jams sva 00