बॉलिवूडचे शेहनशाह अमिताभ बच्चन यांचा कामाप्रती असलेला उत्साह आपल्याला ठाऊक आहेच. आजच्या तरुण अभिनेत्यांनासुद्धा अमिताभ बच्चन यांच्या काम करण्याच्या पद्धतीचा हेवा वाटतो. याबरोबरच अमिताभ हे त्यांच्या चाहत्यांशी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन आणि ब्लॉगच्या माध्यमातून जोडलेले असतात. इतकंच नव्हे तर दर रविवारी ते त्यांच्या बांगल्याबाहेर येऊन त्यांच्या लाखों चाहत्यांनाही भेटतात. गेली कित्येक वर्षं ही प्रथा अशीच सुरू आहे.
नुकतंच बिग बी यांनी त्यांच्या जीवनातील अशाच एका गोष्टीचा खुलासा केला आहे. आपल्या एका ब्लॉगच्या माध्यमातून ‘जलसा’ या बांगल्यातील स्वतःची आवडती जागा कोणती हे अमिताभ बच्चन यांनी शेअर केले आहे. ‘जलसा’मधील त्या जागेचा एक छान फोटोदेखील अमिताभ यांनी त्यांच्या ब्लॉगमध्ये शेअर केला आहे.
आणखी वाचा : ‘गँग्स ऑफ वासेपूर ३’ कधी येणार? अभिनेता व लेखक झीशान कादरीने दिलं स्पष्ट उत्तर
फोटोमध्ये बिग बी हे त्यांच्या इन-हाउस रेकॉर्डिंग रूममध्ये बसलेले दिसत आहेत. त्यांच्याबरोबर त्या खोलीत एक मायक्रोफोन, एक मिक्सर नियंत्रक आणि रेकॉर्डिंगसाठी लागणाऱ्या इतर काही गोष्टी आहेत. यावरून बिग बी यांच्या आयुष्यात संगीत किती महत्त्वाचं आहे आणि यामुळेच तुमच्या आयुष्याला कशी दिशा मिळते याबद्दलही अमिताभ यांनी भाष्य केलं आहे.
‘जलसा’मधील या खोलीत घालवलेला प्रत्येक क्षण अमिताभ यांच्यासाठी अमूल्य आहे कारण या खोलीत ते संगीताशी जोडलेले असतात असंही त्यांनी म्हंटलं आहे. अमिताभ बच्चन आता आर बल्की यांच्या ‘घुमर’ या चित्रपटात विशेष भूमिकेत दिसणार आहेत. याच चित्रपटात अमिताभ बच्चन यांचा मुलगा अभिषेक बच्चनही मुख्य भूमिकेत आहे. शिवाय अमिताभ प्रभास, दीपिका पदूकोण आणि कमल हासन यांच्याबरोबर ‘कल्कि २८९८’मध्येही झळकणार आहेत.