अमिताभ बच्चन व रेखा यांचं अफेअर होतं. बॉलीवूडमधील सुपरहिट जोडी ही खऱ्या आयुष्यात लग्नबंधनात अडकेल, अशा चर्चा होत्या. पण दोघे वेगळे झाले आणि अमिताभ बच्चन यांनी जया बच्चन यांच्याशी लग्नगाठ बांधली. अमिताभ बच्चन व जया बच्चन यांचं लग्न खूप घाईत झालं होतं. खुद्द अमिताभ यांनीच याबाबत खुलासा केला आहे. बिग बी व जया यांच्या लग्नाला ५० वर्षे झाली आहेत.
अमिताभ बच्चन लोकप्रिय गेम शो ‘कौन बनेगा करोडपती’ होस्ट करत आहेत. सध्या शोचे १५ वे पर्व सुरू आहे. अमिताभ या शोमध्ये त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील अनेक किस्से शेअर करत असतात. त्यांनी २ नोव्हेंबर रोजी प्रसारित झालेल्या एपिसोडमध्ये लग्नाचा किस्सा सांगितला. शोमध्ये सध्या फॅमिली स्पेशल वीक सुरू आहे. बिग बी यांनी हरियाणातील हिसार येथील आशिकाना अरोराबरोबर गेम सुरू केला होता. आशिकानाने खेळ सोडल्यावर शबनम, सुरेश आणि मनन हे हॉटसीटवर आले.
या एपिसोडमध्ये बिग बींनी या तिघांना विचारलं की ते जिंकलेल्या पैशांचे काय करतील. उत्तर देताना आपल्या मुलीच्या लग्नासाठी आणि मुलाच्या शिक्षणासाठी काही पैसे वाचवणार असून अतिरिक्त पैशातून पत्नी शबनमबरोबर डेटवर जाणार असल्याचे सुरेश यांनी सांगितले. त्यानंतर बिग बींनी सुरेश यांना सुखी वैवाहिक जीवनासाठी काही टिप्स विचारल्या.
सुरेश यांनीही अमिताभ बच्चन यांना त्यांच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित प्रश्न विचारला. तुम्ही जया बच्चन यांच्याशी लग्न करण्यासाठी काय केलं होतं? असं विचारल्यावर बिग बी म्हणाले, “आम्ही एकत्र काम करत होतो आणि एके दिवशी आम्ही लग्न करण्याचा निर्णय घेतला. मग अचानक आम्ही लग्नगाठ बांधली.” दरम्यान, बिग बी व जया बच्चन यांनी सहजीवनाची ५० वर्षे पूर्ण केली आहेत. त्यांनी ३ जून १९७३ रोजी लग्न केलं होतं.