बॉलीवूडचे शहेनशाह अमिताभ बच्चन सध्या ‘कौन बनेगा करोडपती १६’ हा लोकप्रिय शो होस्ट करत आहेत. नुकत्याच पार पडलेल्या एका भागात त्यांनी त्यांच्या संघर्षाच्या दिवसांशी संबंधित एक हृदयस्पर्शी किस्सा प्रेक्षकांसमोर मांडला. या शोमध्ये सायबर सिक्युरिटी कंपनीचे सल्लागार अंशुमन माथूर आणि परितोष गुप्ता हजर होते. चर्चेदरम्यान बिग बींनी त्यांच्या कोलकाता येथील दिवसांबाबत सांगितले. अमिताभ बच्चन यांनी त्या काळात रेसकोर्समध्ये जाऊन अतिरिक्त पैसा कमावण्याचा प्रयत्न केला होता.

रेसकोर्सचा अनुभव

अमिताभ बच्चन म्हणाले, “जेव्हा मी कोलकात्यात नोकरी करत होतो, तेव्हा मला दरमहा सुमारे ३०० ते ४०० रुपये मिळायचे. मात्र, तेवढे पैसे पुरेसे वाटत नसत. त्यामुळे जास्त पैसा कमावण्यासाठी मी कोलकात्याच्या रेसकोर्सवर जात असे. तिथे जाऊन काही पैसे मिळवता येतील, अशी आशा मला होती” रेसकोर्स ही एक अशी जागा आहे, जिथे लोकांना सहज व्यसन लागते, असे त्यांनी पुढे नमूद केले.

हेही वाचा…“जगातील माझ्या सर्वात…”, सलमान खानच्या वडिलांसाठी लुलिया वंतूरची पोस्ट; म्हणाली, “त्यांनी मला…”

वडिलांचा सल्ला

अमिताभ बच्चन यांनी सांगितले की, त्यांच्या आई-वडिलांशी त्यांचे खूप चांगले नाते होते. त्या काळात त्यांनी रेसकोर्सला जाण्याबद्दल त्यांना सांगितले. तेव्हा त्यांच्या वडिलांनी काही न बोलता त्यांना एक पत्र लिहून दिले. त्या पत्रात त्यांनी लिहिले होते, “जे पैसे कमावण्यासाठी खूप मेहनत किंवा कष्ट घ्यावे लागत नाहीत, असे पैसे घेणे योग्य नाही.”

वडिलांचा सल्ला ऐकला

आपल्या वडिलांच्या या सल्ल्याने अमिताभ बच्चन यांच्या आयुष्याला नवा मार्ग मिळाला. त्यांनी ठरवले की, आता कधीही रेसकोर्सवर जाणार नाही. ते म्हणाले, ” त्या पत्रातून माझे वडील मला रेसकोर्ससारख्या ठिकाणी जाऊन पैसा मिळवणे चुकीचे आहे हे सांगू इच्छित होते आणि मी त्यांचा सल्ला ऐकला.”

हेही वाचा…Video: “तू मराठी आहेस का?”, चाहत्याच्या प्रश्नावर मृणाल ठाकूरने ‘हे’ गाणं गात दिलं उत्तर, पाहा व्हिडीओ

प्रेक्षकांसाठी प्रेरणादायी किस्से

बिग बी त्यांच्या कार्यक्रमात अशा अनेक प्रेरणादायी गोष्टी सांगत असतात. सोशल मीडियावर ते नियमितपणे सक्रिय राहतात आणि ब्लॉगच्या माध्यमातूनही आपले विचार शेअर करतात.