अभिताभ बच्चन यांच्या प्रसिद्ध चित्रपटांपैकी शहेनशहा हा एक चित्रपट आहे. मात्र, अमिताभ बच्चन(Amitabh Bachchan) यांना अशा एका आजाराचे निदान झाले होते; ज्यामुळे हा चित्रपट कधीच न बनण्याच्या मार्गावर होता. त्याचे कारण म्हणजे ‘शहेनशहा’ चित्रपटाचे शूटिंग सुरू होण्याच्या काही दिवस आधी ‘कूली’च्या शूटिंगदरम्यान अमिताभ बच्चन यांचा मोठा अपघात झाला होता. त्यानंतर त्यांना मायस्थेनिया ग्रॅव्हिस या आजाराचे निदान झाले होते. या आजारात स्नायू कमकुवत होतात. त्यामुळे बिग बींना ‘शहेनशहा’ चित्रपटाचे शूटिंग करणे अशक्य होते. आता या चित्रपटाचे निर्माते-दिग्दर्शक टीनू आनंद यांनी अमिताभ बच्चन हे चित्रपटात काम करणार नसल्याने त्यांना मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागला, याची आठवण एका मुलाखतीत सांगितली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अमिताभ बच्चन ‘शहेनशहा’ चित्रपटात करणार नव्हते काम

टीनू आनंद यांनी नुकतीच ‘रेडिओ नशा’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी म्हटले, “‘शहेनशहा’ चित्रपटाचे शूटिंग रद्द झाले. मात्र, त्याआधीच हजारो आणि लाखो रुपये युनिट, विमानाची तिकिटे आणि इतर गोष्टींवर खर्च करण्यात आले होते. त्यानंतर ज्यांच्याकडून मी पैसे घेतले होते, ते पैसे परत मागण्यासाठी माझे दार ठोठावू लागले. माझ्यासाठी ते पैसे परत करणे अशक्य होते. त्यामुळे आम्ही अमिताभ बच्चन जी भूमिका करणार होते, त्यासाठी दुसऱ्या अभिनेत्याचा शोध घ्यायला सुरुवात केली.”

पुढे ते म्हणतात, “मी जॅकी श्रॉफ किंवा जितेंद्रला अमिताभच्या जागी शहेनशहाच्या मुख्य भूमिकेत घ्यायचे ठरवले. आम्हाला शहेनशहा चित्रपट बनवायचा होता आणि त्याला जवळजवळ एक वर्ष लागले. जॅकी ही भूमिका करण्यास तयार झाला. अमिताभ बच्चनऐवजी जॅकी श्रॉफ भूमिका साकारणार याची शक्यता निर्माण झाल्याने त्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्याचा आनंद तो घेत होता. या सगळ्या चर्चांमध्येच त्याने तीन किंवा चार चित्रपट साइन केले. दुसरीकडे जितेंद्रने स्पष्ट सांगितले की, मी अमिताभची जागा घेऊ शकत नाही.”

हेही वाचा: आजीचं प्रेम! नीना गुप्ता यांनी शेअर केला नातीबरोबरचा पहिला फोटो; मुलीच्या चिमुकल्या लेकीला जवळ घेत म्हणाल्या…

“या सगळ्या प्रयत्नांनंतर लक्षात आले की, अमिताभ बच्चनच त्या भूमिकेसाठी योग्य आहेत. बिग बींप्रमाणे शहेनशहाची भूमिका कोणीही साकारू शकणार नाही. त्यामुळे हा प्रोजेक्ट थांबवला गेला. हा काळ माझ्यासाठी आव्हानात्मक होता. मी एक वर्ष गरिबी अनुभवली.”

दरम्यान, अमिताभ बच्चन यांचे भाऊ अजिताभ बच्चन यांनी टीनू आनंद यांना विश्वास दिला की, जर उपचारानंतर अमिताभ त्यांच्या दोन अपूर्ण चित्रपटांचे शूटिंग करू शकले, तर शहेनशहा चित्रपटाचेदेखील शूटिंग करतील. त्यानंतर तसेच घडले. अमिताभ बच्चन यांची प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट १९८८ ला प्रदर्शित झाला होता. अमिताभ बच्चन यांच्या कारकिर्दीतील हा महत्त्वाचा चित्रपट मानला जातो.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amitabh bachchan was diagnosed with myasthenia gravis just before shahenshah shooting director tinnu anand considered casting jackie shroff or jeetendra to replace big b nsp