बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन आजच्या घडीला वयाच्या ८२ व्या वर्षी सुद्धा सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतात. आपल्या दैनंदिन तसेच सामाजिक जीवनातील विविध गोष्टींवर ‘बिग बी’ त्यांच्या ब्लॉगमार्फत भाष्य करतात. अनेकदा जेव्हा अमिताभ बच्चन रात्री उशिरा किंवा पहाटे लवकर एखादा ब्लॉग पोस्ट करतात तेव्हा चाहते त्यांच्या आरोग्याबद्दल चिंता व्यक्त करतात. त्यांना पुरेशी विश्रांती घेण्याचा सल्ला देतात. पण, ‘बिग बीं’ना अनेकदा रात्रीची झोप येत नाही असा खुलासा दिग्दर्शक अपूर्व लाखियाने केला आहे. अपूर्वने ‘बिग बीं’बरोबर ‘एक अजनबी’ चित्रपटावेळी एकत्र काम केलं होतं.

सेटवर बराच वेळ शूटिंग करूनही अमिताभ बच्चन कधीच थकले नाहीत असं अपूर्वने यावेळी सांगितलं. ‘एक अजनबी’ चित्रपटाचं शूटिंग सुरू असताना संपूर्ण टीम बँकॉक येथे वास्तव्याला होती. हा सिनेमा २००५ मध्ये प्रदर्शित झाला होता. त्यावेळी त्याचं वय ६३ वर्षे होतं. अमिताभ बच्चन यांना त्याठिकाणची संस्कृती, बँकॉकचं कल्चर एक्सप्लोर करायचं होतं. यावेळी ते एका क्लबमध्ये गेले होते.

अपूर्व ‘फ्रायडे टॉकीज’ला दिलेल्या मुलाखतीत सांगतो, “अमिताभ बच्चन यांनी त्यांना बँकॉक फिरायचंय असं मला सांगितलं. त्यावेळी मी त्यांना म्हणालो, “सर, हे पॅटपोंग आहे, इथे लाईव्ह शो असतात, जर मी तुम्हाला घेऊन गेलो तर मोठा गोंधळ होईल” पण, ते म्हणाले ‘नाही आपण जाऊयात…’ मग मी सुद्धा तयार झालो. यावेळी अर्जुन रामपाल, विक्रम चटवाल, पेरिझाद जोरबियन आणि निर्माता बंटी वालिया त्यांच्याबरोबर बँकॉकमधील रेड लाईट एरिया असलेल्या पॅटपोंगला गेले होते. अमितजींनी त्यावेळी एक शर्ट घातला होता, त्याची सगळी बटणं बंद होती आणि त्यांनी Thai धोतरसारखं काहीतरी घातलं होतं.”

अपूर्व लाखिया पुढे म्हणाला, “पॅटपोंग येथे आम्ही एक्झॉटिक **** क्लबमध्ये गेलो होतो. अमितजींनी असा शो कधीही पाहिला नव्हता आणि आम्ही त्या क्लबमध्ये त्यांना घेऊन गेलो होतो. त्याठिकाणी आलेले भारतीय लोक त्यावेळी ‘बिग बीं’ना वेडे झाले होते. ते जुहूमध्येच आहेत असेच सर्वत्र वावरत होते. तो शो संपल्यावर पहाटे अडीच ते तीनच्या सुमारास आम्ही पुन्हा सेटवर आलो आणि त्यानंतर लगेच ‘बिग बी’ ५:३० वाजता सेटवर हजर होते.”

“परदेशात शूटिंग असेल तर, अनेकदा ‘बिग बी’ चित्रपट एकत्र पाहण्याचं आयोजन करायचे. म्हणजेच यश चोप्रा यांना फोन करून ते ‘बंटी और बबली’ हा सिनेमा पाठवायला सांगायचे. मग त्या सिनेमाची रीळ यायची. संपूर्ण टीम एकत्र तो चित्रपट पाहायची.” असं दिग्दर्शकाने सांगितलं.

Story img Loader