अभिनेत्री जया बच्चन सोशल मीडियावर नेहमीच काही ना काही कारणाने चर्चेत असतात. त्यांचे व्हिडीओही अनेकदा व्हायरल होताना दिसतात. अलिकडेच एका शोमध्ये पती अमिताभ बच्चन यांच्याबद्दल असं काही वक्तव्य केलंय की चाहतेही हैराण झाले आहेत. जया बच्चन यांनी अमिताभ यांना बुड्ढा म्हणजेच ते म्हातारे झाले आहेत असं म्हटलं आहे. माझ्या मैत्रिणींनी घरी येणं अमिताभ बच्चन यांना अजिबात आवडत नाही असं हैराण करणारा खुलासा जया बच्चन यांनी केला आहे. नात नव्या नवेली नंदाच्या शोमध्ये जया बच्चन यांनी अमिताभ बच्चन यांच्याबद्दल बरेच खुलासे केले आहेत.
नव्या नवेली नंदाने काही काळापूर्वीच स्वतःचं पॉडकास्ट शो ‘What The Hell’ सुरू केला आहे. या शोमध्ये नुकतीच जया बच्चन सहभागी झाल्या होत्या. यावेळी त्यांनी मुलगी श्वेता नंदा आणि नव्या नवेली नंदा यांच्याशी गप्पा मारताना पती अमिताभ बच्चन यांच्याबद्दल बरेच खुलासे केले आहेत. या शोमध्ये जया, श्वेता आणि नव्या यांनी त्यांच्या मित्र- मैत्रिणींबद्दल भाष्य केलं आहे. यावेळी जया बच्चन यांनी सांगितलं की त्यांच्या ७ मैत्रिणी आहेत ज्यांना त्या मागच्या ४ दशकांपासून ओळखतात. आपल्या या मैत्रिणींच्या ग्रुपला त्यांनी ‘सात सहेली’ असं नाव दिलं आहे. नव्या आणि श्वेताही जया यांच्या मैत्रिणींना याच नावाने ओळखतात.
आणखी वाचा- “माझा नवरा मला सुख देतो की…” प्रिया बापटने सांगितला ट्रोलिंगचा धक्कादायक अनुभव
जया बच्चन सांगतात जेव्हा त्यांच्या या मैत्रिणी घरी येतात तेव्हा त्यांचा मुलगा अभिषेक बच्चन आणि नातू अगस्त्य खूश होतात मात्र पती अमिताभ बच्चन यांना मात्र ते आवडत नाही. त्यांचा चेहरा पडतो. जया बच्चन यांच्या मैत्रिणींना घरी पाहिल्यानंतर अमिताभ बच्चन चिडतात. त्या नव्याला म्हणाल्या, “तुझे आजोबा अचानक चिडतात. रागावतात. मला वर जायचं आहे एक्सक्यूज मी लेडीज असं म्हणून ते निघून जातात. ते घरी नसताना माझ्या मैत्रिणी खूप खूश असतात.”
आजी जया बच्चन यांचं बोलणं ऐकून नव्या म्हणते, “आजोबा तिथे असल्याने कदाचित तुमच्या मैत्रिणींना असहज वाटत असेल.” त्यावर जया म्हणाल्या, “असं काहीच नाही. त्या त्यांना मागच्या एवढ्या वर्षांपासून ओळखतात. पण ते आता बदलले आहेत. आता त्यांचं वय झालंय ते म्हातारे झालेत. एक तर मन आणि शारीरिकरित्या तुम्ही म्हातारे होता किंवा शरीराने म्हातारे होऊनही मनाने तरुण राहता. मी म्हातारी झाले नाही. मी अगदी १६ वर्षांच्या मुलांसोबतही बोलू शकते.”
आणखी वाचा- “माझ्या मुलांनी माझ्यासारखे होऊ नये कारण…” अमिताभ बच्चन यांची लेक श्वेताने केला खुलासा
दरम्यान अमिताभ बच्चन आणि जया बच्चन १९७३ मध्ये लग्न केलं होतं. त्यांच्या लग्नाला आता ४९ वर्षं झाली आहेत. अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांनी आतापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं आहे. येत्या ११ ऑक्टोबरला अमिताभ बच्चन यांचा ८० वा वाढदिवस आहे. सध्या ते ‘कौन बनेगा करोडपती १४’चं शूटिंग करत आहेत. याशिवाय त्यांच्याकडे इतर बरेच प्रोजेक्ट आहेत. लवकरच ते ‘गुडबाय’मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.