बॉलीवूडचे बादशाह, बिग बी म्हणून अमिताभ बच्चन(Amitabh Bachchan) यांची ओळख आहे. ८२ वर्षीय अमिताभ बच्चन आजही चित्रपटांत महत्त्वाच्या भूमिका साकारत प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसतात. कौन बनेगा करोडपती या शोचे कित्येक वर्षांपासून ते सूत्रसंचालन करीत आहेत. या कार्यक्रमाच्या मंचावर अमिताभ बच्चन चित्रपटांतील अनेक किस्से सांगतात आणि प्रेक्षकांचे मनोरंजन करतात. याबरोबरच बिग बी सोशल मीडियावरही सक्रिय असल्याचे दिसतात. त्यांच्या खासगी आयुष्यामुळेदेखील अमिताभ बच्चन चर्चेत येतात. अमिताभ बच्चन व रेखा यांच्या नात्याविषयी अनेकदा बोलले जाते. आजही प्रेक्षकांसाठी अमिताभ बच्चन, रेखा(Rekha) व जया बच्चन यांच्या लव्ह ट्रँगलविषयी उत्सुकता असलेली दिसते. मात्र, रेखा किंवा जया बच्चन यांपैकी कोणी अमिताभ बच्चन यांची पहिली प्रेमिका नव्हती. हनिफ झवेरी यांनी एका मुलाखतीत नुकताच याबद्दल खुलासा केला आहे.
अमिताभ बच्चन यांची पहिली गर्लफ्रेंड होती ‘ही’ मुलगी
प्रसिद्ध लेखक हनिफ झवेरी यांनी नुकतीच ‘मेरी सहेली’ या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली होती. या मुलाखतीत त्यांनी हनिफ झवेरी यांनी बिग बींचे पहिले प्रेम कोण होते, याचा खुलासा केला आहे. हनिफ झवेरी म्हणाले, “त्यावेळी अमिताभ बच्चन यांनी अभिनय क्षेत्रात पाऊलही ठेवले नव्हते. ते कोलकातामध्ये काम करीत होते. त्यावेळी ते एका मुलीबरोबर रिलेशनशिपमध्ये होते. तेव्हा ते एका कंपनीत काम करायचे. ब्रिटिश एअरवेज असे या कंपनीचे नाव होते. त्यावेळी त्यांना २५०-३०० रुपये मिळायचे. तेव्हा त्यांच्या आयुष्यात माया नावाची एक मुलगी आली. त्या दोघांचं एकमेकांवर खूप प्रेम होतं. ते एकमेकांना भेटायचे.”
“अमिताभ बच्चन कालातरांने त्यांचं अभिनयाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुंबईत आले. त्यानंतर त्या दोघांनाही कठीण परिस्थितीचा सामना करावा लागला. जेव्हा ते मुंबईत आले तेव्हा ते त्यांच्या आई तेजा बच्चन यांच्या जवळच्या मित्राच्या घरी वास्तव्यास होते. तिथे त्यांना माया भेटण्यासाठी येत असे. अमिताभ बच्चन यांना भीती वाटली की, त्यांच्या आईला मायाबद्दल माहीत होईल. त्यामुळे त्यांनी ते घर सोडले. त्यावेळी ते अन्वर अली यांच्या सात हिंदुस्तानी या चित्रपटात काम करत होते. त्यांनी त्यांच्या राहण्याची समस्या अन्वर अली यांना सांगितली. अन्वर अली यांनी मेहबूब अली यांच्या घरात त्यांना राहण्यासाठी जागा दिली. माया व अमिताभ बच्चन यांचे नाते चांगले होते; मात्र ते टिकू शकले नाही. अमिताभ बच्चन त्यावेळी खूप लाजाळू होते; तर माया खूप बोल्ड होती. त्यांच्या दोघांच्या व्यक्तिमत्त्वात खूप फरक होता. अन्वर अली यांनी अमिताभ बच्चन यांना वेगळे होण्याचा सल्ला दिला. त्यांच्या मतानुसार त्या दोघांच्या व्यक्तिमत्त्वात खूप फरक असून, बच्चन कुटुंबात माया राहू शकणार नाही. अमिताभ बच्चन यांना जेव्हा त्यांच्यात व मायामध्ये खूप फरक असल्याचे जाणवले तेव्हा त्यांनी मायापासून हळूहळू दूर राहण्यास सुरुवात केली. कालातरांने दोघांनी हे नाते संपवले.”
दरम्यान, रेखा व अमिताभ बच्चन यांच्या नात्याबद्दलही अनेकदा बोलले जाते. जया बच्चन व अमिताभ बच्चन यांनी ३ जून १९७३ ला लग्नगाठ बांधली. आजही रेखा, जया बच्चन व अमिताभ बच्चन यांच्या प्रेमी त्रिकोनाबद्दल चर्चा रंगताना दिसतात. अमिताभ बच्चन यांच्या कामाबद्दल बोलायचे, तर ते कल्की २८९८ एडी या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसले होते. त्यानंतर त्यांनी वैट्टयन या चित्रपटात रजनीकांत यांच्याबरोबर स्क्रीन शेअर केली होती. आता आगामी काळात ते कोणत्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.