नाग आश्विन दिग्दर्शित ‘कल्की 2898 एडी’ चित्रपटाची अनेक दिवसांपासून प्रेक्षक मोठ्या आतुरतेने वाट पाहत होते. आज गुरुवारी (२७ जून) चित्रपटगृहात प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी या चित्रपटाने हजेरी लावली आहे. मात्र, ‘कल्की‘च्या दिग्दर्शकांनी चित्रपट प्रदर्शित होण्याच्या काही तासांपूर्वी प्रेक्षकांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. प्रभास, कमल हसन, अमिताभ बच्चन यांच्याशिवाय प्रेक्षकांचा आणखी एक लाडका अभिनेता या चित्रपटात दिसणार असल्याची माहिती पोस्टर रिलीज करीत दिली आहे.

कोण आहे हा अभिनेता?

कल्की २८९८ एडी या चित्रपटात प्रभास, कमल हसन, अमिताभ बच्चन यांच्याबरोबर दाक्षिणात्य अभिनेता दुलकिर सलमानदेखील आपल्या अभिनयाची झलक दाखविताना दिसणार आहे. चित्रपट प्रदर्शित होण्याच्या काही तास अगोदर दुलकिरच्या लूकचे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहेत. कल्की २८९८ एडी हा चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक असलेल्या प्रेक्षकांना दुलकिर सलमानच्या चित्रपटात असण्याने आनंद झाल्याचे सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे.

हेही वाचा : वयात १८ वर्षांचं अंतर, लग्नाला विरोध ते सहजीवनाची ३५ वर्षे! अशोक व निवेदिता सराफ यांची सदाबहार प्रेमकहाणी

दाक्षिणात्य अभिनेता दुलकिरचा चाहतावर्ग मोठा आहे. दुलकिरच्या सहज अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात आपली वेगळी जागा निर्माण केली आहे. ‘किंग ऑफ कोटा’, ‘सीता रामम’, ‘सॅल्यूट’ , ‘चुप : रिव्हेंज ऑप आर्टिस्ट , ‘सोलो’ , ‘काली’ , ‘द झोया फॅक्टर’, ‘कारवाँ’ , ‘एबीसीडी’ अशा अनेक चित्रपटांतून आणि वेगवेगळ्या भूमिकांमधून त्याने प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. आता ‘कल्की’मधील दुलकिरची भूमिका प्रेक्षकांना आवडणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. विष्णूचा दहावा अवतार कल्की आधुनिक काळात वाईट शक्तींपासून जगाला वाचविण्यासाठी जन्म घेतो, अशा आशयाचा हा चित्रपट आहे.

दरम्यान, ‘कल्की २८९८ एडी’ या चित्रपटात अनेक दिग्गज कलाकारांचा समावेश आहे. अमिताभ बच्चन, कमल हसन, प्रभास, दुलकिर सलमान, दीपिका पदुकोण, दिशा पटानी हे कलाकार यात दिसणार आहेत. याआधी काही कलाकारांचे चित्रपटातील लूक समोर आले होते. कमल हसन हे खलनायकाच्या भूमिकेत असून, त्यांच्या लूकने लक्ष वेधून घेतले होते. सर्व कलाकारांच्या भूमिका दमदार असल्याने प्रेक्षकांच्या चित्रपटाकडून अपेक्षा वाढल्या आहेत. यापूर्वी समोर आलेल्या ट्रेलरने ‘कल्की’विषयी चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. ६०० कोटींच्या बजेटमध्ये तयार झालेला हा चित्रपट प्रेक्षकांना चित्रपटगृहाकडे खेचून आणण्यात यशस्वी ठरणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. त्याबरोबरच ‘कल्की २८९८ एडी’ बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई करीत नवीन रेकॉर्ड तयार करणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.