१९७० च्या दशकात अमोल पालेकर यांनी बॉलीवूडमध्ये स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली होती. त्या काळात अमिताभ बच्चन, राजेश खन्नासारखे सुपरस्टार लोकांच्या मनावर अधिराज्य करत असतानादेखील प्रेक्षकांच्या मनात अमोल पालेकर यांनी स्वतःसाठी जागा निर्माण केली होती. अभिनयाबरोबरच अमोल पालेकर यांनी दिग्दर्शनातूनही स्वतःची अशी वेगळी छाप सोडली.

‘आक्रीत’, ‘अनकही’, ‘थोडासा रुमानी हो जाये’ अशा चित्रपटांतून त्यांनी वेगवेगळे विषय हाताळले. नव्या पिढीच्या कलाकारांबरोबरही अमोल पालेकर यांनी काही उत्तम चित्रपट दिले, त्यापैकीच एक म्हणजे शाहरुख खान, राणी मुखर्जी यांचा ‘पहेली’. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फार कमाई करू शकला नाही पण समीक्षकांनी आणि प्रेक्षकांनी याचं तोंडभरून कौतुक केलं.

आणखी वाचा : ‘दृश्यम ३’च्या रिलीज डेटबाबत मूळ चित्रपटाचे दिग्दर्शक जीतू जोसेफ यांचं मोठं विधान; म्हणाले, “या बातम्या…”

२००५ साली आलेला हा चित्रपट तेव्हाच्या ऑस्कर पुरस्कारांसाठीही पाठवण्यात आला होता. नुकताच या चित्रपटाशी निगडित एक किस्सा अमोल पालेकर यांनी ‘राजश्री’ला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये सांगितला आहे. शाहरुख या चित्रपटात मुख्य भूमिकेत होता, पण या चित्रपटाची निर्मिती करण्यासाठी तो कसा पुढे आला याबद्दल अमोल पालेकरांनी सांगितलं आहे.

जेव्हा अमोल पालेकर शाहरुखला याची कथा ऐकवायला गेले त्याबद्दल सांगताना ते म्हणाले, “मी जेव्हा शाहरुखला पूर्ण गोष्ट ऐकवली, त्यानंतर शाहरुखने सिगारेट शिलगावली अन् तो म्हणाला, तुमची हरकत नसेल तर मी हा चित्रपट प्रोड्यूस करू का?” यानंतर अमोल पालेकर यांच्यासाठी सगळ्याच गोष्टी फार सोप्या झाल्या. पुढे ते म्हणाले, “शाहरुखबरोबर एक अभिनेता आणि एक निर्माता म्हणून काम करणं हे खरंच खूप सुंदर होतं, त्याने कधीच कोणत्याही गोष्टीसाठी आडकाठी केली नाही. प्रत्येक कलाकाराच्या तारखांपासून इतरही सगळ्या गोष्टी त्याने फार उत्तमरीत्या हाताळल्या.”

‘पहेली’ या चित्रपटात राणी मुखर्जी, शाहरुख खानसह अनुपम खेर, जुही चावला, सुनील शेट्टी, अमिताभ बच्चन, नीना कुलकर्णी यांच्यासारखे कलाकारही होते. हा चित्रपट १९७३ मध्ये आलेल्या ‘दुविधा’ या चित्रपटाचा अधिकृत रिमेक होता.

Story img Loader