दिवंगत अभिनेते अमरीश पुरी यांचा आज ९१ वा वाढदिवस आहे. बॉलिवूडमधील प्रसिद्ध खलनायक अशी ओळख असलेले अमरीश पुरी अभिनेते बनण्यासाठी या क्षेत्रात आले होते. आपल्या कारकिर्दीत एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपट देणारे अमरीश पुरी यांनी अनेक अजरामर भूमिका केल्या. आपल्या नकारात्मक भूमिकांमुळे प्रेक्षकांची मनं जिंकणारे अमरीश पुरी हे कदाचित एकमेवच अभिनेते असावे.
अमरीश पुरी यांनी ३० वर्षांहून अधिक काळ चित्रपटांमध्ये काम केले आणि नकारात्मक भूमिका इतक्या प्रभावीपणे साकारल्या की ते हिंदी चित्रपटांमध्ये खलनायकाची भूमिका साकारणारे सर्वात लोकप्रिय अभिनेते बनले. अमरीश पुरी यांचा जन्म पंजाबमधील जालंधर इथे झाला होता. अमरीश पुरी हिरो बनण्यासाठी बॉलिवूडमध्ये आले होते, पण नशिबाने त्यांना खलनायक बनवले. एका मुलाखतीदरम्यान अमरीश पुरी यांचा मुलगा राजीव पुरी म्हणाला होता की, “माझे बाबा तरुणपणी हिरो बनण्यासाठी मुंबईला आले होते. त्यांचे मोठे भाऊ मदन पुरी हे आधीपासूनच चित्रपट क्षेत्रात होते. पण निर्मात्यांनी त्यांना म्हटलं की तुझा चेहरा हिरोसारखा नाही. त्यामुळे ते खूप निराश झाले होते.”
कोकणातील गावी पोहोचला भाऊ कदम, कौलारू घरातील लाकडी फळीवर लिहिलेली ‘ती’ दोन वाक्ये चर्चेत
चित्रपटांमध्ये नायकाची भूमिका न मिळाल्याने अमरीश पुरी रंगभूमीकडे वळले. तिथे त्यांना आपल्या दमदार अभिनयाने खूप प्रसिद्धी मिळाली. त्यानंतर १९७० मध्ये त्यांनी चित्रपटांमध्ये काम करण्यास सुरुवात केली. पुढे राजीवने सांगितलं की “बाबांनी खूप उशिरा चित्रपटात काम करायला सुरुवात केली. पण नाट्यकलावंत म्हणून त्यांना खूप प्रसिद्धी मिळाली होती. तेव्हापासून आम्ही त्यांचे स्टारडम पाहिले होते आणि तो किती मोठा कलाकार आहे याची कल्पना आम्हाला आली होती.”
७० च्या दशकात अमरीश पुरी यांनी ‘निशांत’, ‘मंथन’, ‘भूमिका’, ‘आक्रोश’ अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केलं. १९८७ मध्ये ‘मिस्टर इंडिया’मधील त्यांचे ‘मोगॅम्बो’ हे पात्र खूप लोकप्रिय झाले होते. ‘मोगॅम्बो खुश हुआ’ हा त्यांचा डायलॉग आजही लोकांना लक्षात आहे.