Ananya Panday: बॉलीवूड अभिनेत्री अनन्या पांडे कायम सोशल मीडियावर चर्चेत असते. अभिनयाच्या जोरावर ती सिनेविश्वात तिची एक वेगळी ओळख निर्माण करत आहे. अनन्याने आजवर बॉलीवूडला अनेक चांगले चित्रपट दिले आहेत. अभिनयाच्या कारकि‍र्दीत सध्या ती यशाच्या दिशेने वाटचाल करत आहे. अनन्या सध्या ज्या पद्धतीने बॉलीवूडमध्ये स्वत:ची ओळख निर्माण करत यशाची एक एक पायरी चढत आहे, अगदी तसेच चंकी पांडे यांनीही बॉलीवूडमध्ये नाव कमावले होते. चंकी पांडे यांनी त्यांच्या काळात एकापेक्षा एक हिट चित्रपटांत अभिनय केला. मात्र, त्यांच्या आयुष्यातील ठराविक काळात त्यांना काही चढउतार सहन करावे लागल्याचे अनन्याने सांगितले आहे.

राज शमनीच्या पॉडकास्ट शोमध्ये अनन्याने नुकतीच हजेरी लावली. त्यावेळी तिने आपल्या वडिल्यांच्या आयुष्यात आलेल्या अडचणी आणि चढउतार यांवर मोकळेपणाने भाष्य केलं. अनन्या म्हणाली की, “माझे वडील ८० आणि ९० च्या दशकातील फार मोठे अभिनेते आहेत. माझा जन्म झाला तेव्हा त्यांच्या करिअरमध्ये अनेक चढ-उतार सुरू झाले. मात्र, तरीही त्यांनी अनेक वेगवेगळी कामे करणे सुरू ठेवले. मी लहान असताना अनेकदा पाहिलं की, माझे वडील घरात बसून होते. त्यांच्या हातात काहीही काम नव्हतं. मी त्यांच्याबरोबर एक-दोनवेळा शूटिंगच्या सेटवरसुद्धा गेले होते. त्यांची लोकप्रियता इतकी होती की, त्यांच्यासाठी नेहमीच घराबाहेर गर्दी असायची.”

हेही वाचा : बाहुबली’ फेम अभिनेता ४७ व्या वर्षी अडकला लग्नबंधनात, पत्नीबरोबरचा समुद्रकिनाऱ्यावरील फोटो केला शेअर

अनन्याने पुढे तिला वडिलांकडून काय शिकावे वाटते याबद्दलही सांगितले. ती म्हणाली की, “माझे वडील अष्टपैलू आहेत. त्यांनी शक्य होईल तितक्या जास्त आणि विविध भाषांमध्ये काम केले आहे. त्यांनी छोट्या चित्रपटांत काम केले, त्यांनी मोठ्या चित्रपटांत काम केले, त्यांनी मुख्य भूमिका, छोटी भूमिका आणि नकारात्मक भूमिकासुद्धा साकारल्या आहेत. मला वाटते, त्यांच्यातील ही चांगली गोष्ट माझ्यामध्येसुद्धा असली पाहिजे.”

हेही वाचा : मेहंदी रंगली गं! रेश्मा शिंदे चढणार बोहल्यावर; लग्नाआधीच्या विधींना सुरुवात, फोटोंवर कमेंट्सचा पाऊस

मुलाखतीमध्ये अनन्याने वडिलांबरोबर तिचे काही मतभेद होतात यावरही भाष्य केले. “माझ्या वडिलांना व्यावसायिक चित्रपट सर्वात महत्त्वाचे वाटतात, कारण त्यांच्या बुद्धीमध्ये सिनेमा आणि अभिनयाची वेगळी परिभाषा आहे; तर मला प्रत्येक गोष्टीमध्ये थोडे फार काम करावे आणि सर्व काही शिकून घ्यावे असे वाटते. या विचारांशी माझे बाबा सहमत नाहीत. त्यांना असे वाटते, मी मोठ्या व्यावसायिक चित्रपटांमध्ये काम केले पाहिजे. मात्र, आता त्यांच्या या विचारात सुद्धा बदल होत आहे. ‘कॉल मी बे’नंतर त्यांना माझ्यावर फार गर्व झाला. तसेच तुला जे हवं आहे तेच तू कर, असंही त्यांनी म्हटलं”, असं अनन्या पांडे म्हणाली आहे.