अनन्या पांडेची चुलत बहीण अलाना पांडेने काही दिवसांपूर्वी लवकरच आई होणार असल्याची आनंदाची बातमी सोशल मीडियावर शेअर केली होती. अलाना व इवॉर मॅक गेल्यावर्षी विवाहबंधनात अडकले होते. आता लवकरच अलाना आई, तर बॉलीवूड अभिनेत्री अनन्या पांडे मावशी होणार आहे.
अलानाने इन्स्टाग्रामवर नुकत्याच शेअर केलेल्या एका व्हिडीओने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. यामध्ये तिने जाहीररित्या मुलगा होणार की मुलगी याबद्दल माहिती दिली आहे. जन्माआधीच बाळाचं लिंग सांगितल्याने अनेकांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
हेही वाचा : कलर्स मराठीवर सुरू होणार नवीन मालिका; कोण आहे चिमुकली ‘इंद्रायणी’? ‘महाराष्ट्र शाहीर’मध्ये केलंय काम
अलाना तिच्या पतीबरोबर लॉस एंजेलिसला राहते. अमेरिकेत बाळाच्या जन्माआधी लिंग चाचणी करणे बेकायदेशीर नाही. त्यामुळेच अलानाने या व्हिडीओमध्ये मुलगा होणार की मुलगी ते सांगितलं आहे. या व्हिडीओमध्ये अलाना-इवॉरने पांढऱ्या रंगाचे ड्रेस परिधान केले आहेत. याशिवाय त्यांच्या जवळ ‘बेबी’ नाव लिहिलेला केक असल्याचं या व्हिडीओमध्ये पहायला मिळत आहे. जेव्हा हे जोडपं ग्लासने केक कापतं तेव्हा आतल्या स्पंजमध्ये हलका निळा रंग दिसतो. हाच रंग अलानाला लवकरच मुलगा होणार असल्याचं दर्शवतो.
हेही वाचा : Video : “तुला मुलगी झाल्याचं ऐकलं…”, विराट कोहलीने दुरुस्त केली एलन वॉकरची ‘ती’ चूक; व्हिडीओ व्हायरल
अलानाने जन्माआधीच बाळाचं जेंडर रिव्हिल केल्याने काही नेटकऱ्यांनी यावर नापसंती दर्शवली आहे. तर, सेलिब्रिटी मंडळीनी अलानावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.
दरम्यान, अलाना ही चंकी पांडेचे भाऊ चिक्की पांडे यांची मुलगी आहे. ती अनन्याची चुलत बहीण असून पेशाने मॉडेल आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे. तसेच अनन्याचा जिजू इवॉर फोटोग्राफर व व्हिडीओग्राफर आहे.