‘हेरा फेरी’ चित्रपटाने प्रेक्षकांची मनं जिंकली होती. आजही हा चित्रपट अनेकजण आवर्जून बघतात. अक्षय कुमार, सुनील शेट्टी आणि परेश रावल या त्रिकुटाचा हा चित्रपट २००० मध्ये प्रदर्शित झाला होता. २००६ मध्ये या फ्रेन्चायझीचा दुसरा चित्रपट ‘हेरा फेरी २’ प्रदर्शित झाला. या दोन्ही चित्रपटांनी प्रेक्षकांचे खूप मनोरंजन केले होते. आता प्रेक्षक तिसऱ्या भागाची वाट बघत आहेत. ‘हेरा फेरी ३’ हा चित्रपट बऱ्याच काळापासून चर्चेत आहे. या चित्रपटाबाबत नवनवीन गोष्टी समोर येत असतानाच दिग्दर्शक अनीस बज्मी यांनी एक धक्कादायक विधान केलं आहे.
‘हेरा फेरी’ आणि ‘फिर हेरा फेरी’ या दोन्ही चित्रपटांच्या यशानंतर ‘हेरा फेरी ३’ या चित्रपटाचं दिग्दर्शन करण्यासाठी निर्माते गेले काही दिवस उत्कृष्ट दिग्दर्शकाचा शोध घेत होते. या दरम्यान त्यांनी अनीस बज्मी यांना या चित्रपटाचे दिग्दर्शन करण्यासाठी विचारणा केली होती. पण त्यांनी निर्मात्यांची ही ऑफर धुडकावून लावली अशा चर्चा रंगल्या होत्या. पण आता अखेर अनीस बज्मी यांनीच यावर भाष्य केलं आहे.
अनीस बज्मी यांनी नुकतीच ‘बॉलिवूड हंगामा’ला एक मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी अफवांना पूर्णविराम देत ‘हेरा फेरी’चे निर्माते फिरोज नाडियादवाला यांच्याबाबत एक गौप्यास्फोट केला आहे. ते म्हणाले, “‘हेरा फेरी ३’बाबत मी विविध गोष्टी वाचत आहे. अक्षय कुमार या चित्रपटात असणार की नाही, कार्तिक आर्यन अक्षय कुमारची जागा घेणार, तसंच मी हा चित्रपट दिग्दर्शित करणार अशा विविध बातम्या आतापर्यंत मी वाचल्या आहेत. मी या चित्रपटाच्या स्क्रिप्टवर काम करत नसल्याने मला त्याबद्दल काहीही माहिती नाही. निर्माते फिरोज नाडियादवाला यांना या चित्रपटाच्या कथेबद्दल माहिती आहे. त्यावर काम करण्यासाठी ते योग्य व्यक्ती निवडतील. या चित्रपटाची स्क्रिप्ट ऐकल्यावरच हा चित्रपट दिग्दर्शित करायचा की नाही हे मी ठरवेन.”
पुढे ते म्हणाले, “फिरोज यांनी निर्मित केलेल्या ‘वेलकम बॅक’ हा चित्रपट दिग्दर्शित करण्यासाठी मी आकारलेली संपूर्ण फी मला आजपर्यंत मिळालेली नाही. त्यातील काही रक्कम यायची अजून बाकी आहे. त्यामुळे मी जर ‘हेरा फेरी ३’ दिग्दर्शित करण्याचा निर्णय घेतला तर मला माझ्या मानधनाच्या बाबतीत आणखीन सतर्कता बाळगावी लागेल. पण फिरोज माझं ‘वेलकम बॅक’ चित्रपटाचं बाकी असलेलं मानधन ‘हेरा फेरी ३’च्या आधी मला परत करतील अशी मला आशा आहे.”
अनीस बज्मी यांनी यावर्षी ‘भुल भुलैय्या २’ या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं. या चित्रपटाआधी त्यांनी ‘नो एन्ट्री’ आणि ‘वेलकम’ या सुपरहिट चित्रपटांचंही दिग्दर्शन केलं आहे. त्यामुळे आता ते ‘हेरा फेरी ३’ चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळणार का, हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईल.