भारतीय क्रिकेटमध्ये महत्त्वपूर्ण योगदान देणारे दिग्गज फिरकीपटू बिशन सिंग बेदी यांचे सोमवारी (२३ ऑक्टोबर रोजी) निधन झाले. ७७ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानंतर क्रीडा जगतातून तसेच मनोरंजन क्षेत्रातून शोक व्यक्त केला जात आहे. अभिनेता अंगद बेदी हा बिशन सिंग बेदी यांचा मुलगा आहे. वडिलांच्या निधनानंतर अंगदने व त्याची पत्नी नेहाने पोस्ट शेअर केली आहे.
Bishan Singh Bedi: भारताचे महान फिरकीपटू बिशन सिंग बेदी यांचं निधन
पोस्टमध्ये लिहिलंय, “बाबांचं जाणं हे अगदी त्यांच्या सर्वात वेगवान फिरकी बॉलसारखं होतं जे आम्हाला येताना दिसलं नाही. आम्हाला धक्का बसला आहे. ते समृद्ध, निर्भय आणि परिपूर्ण जीवन जगले ज्याने अनेकांना प्रेरणा दिली, हे आठवून आम्हाला सांत्वना मिळत आहे.
सार्वजनिकरित्या आणि वैयक्तिकरित्या प्राप्त झालेला प्रत्येक प्रेमळ मेसेज आम्हाला बळ देत आहे. त्यांचा संयम, हास्य आणि मोठे मन साजरे केल्याबद्दल सर्वांचे आभार. त्यांनी आपल्या आयुष्यात कित्येक पिढ्यांना प्रेरणा दिली हे पाहणं हृदयस्पर्शी आहे. त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक दिवस त्यांच्या कुटुंबाच्या प्रती समर्पण आणि वाहेगुरूंच्या भक्ती, श्रद्धा आणि सेवेत व्यतीत झाला. ते निर्भय जीवन जगण्याचे प्रतिक होते आणि तो आता त्याच्या प्रिय व्यक्तीबरोबर आहेत हे जाणून आम्हाला समाधान मिळत आहे.
बाबा, तुम्ही आमचे निर्भिड लीडर होतात. आम्ही तुमच्या आदर्शांवर जगण्याचा प्रयत्न करू. तुम्ही आम्हाला प्रत्येक वळणावर मार्गदर्शन करत राहा. प्रेम आणि विश्वासात आमच्याबरोबर राहा,” असं अंगद व नेहाने शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे.
दरम्यान, बिशन सिंग बेदी यांनी १९६७ ते १९७९ या काळात ६७ कसोटी सामन्यांमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं. आपल्या १३ वर्षांच्या क्रिकेट कारकिर्दीत त्यांनी २६६ विकेट्स घेतल्या. त्याशिवाय तेव्हा नुकत्याच सुरू झालेल्या एकदिवसीय क्रिकेटमध्येही त्यांच्या नावावर सात विकेट्स आहेत.