Bollywood actors on Pahalgam Terror Attack: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे मंगळवारी दहशतवादी हल्ला झाला. त्यामध्ये अनेक पर्यटकांना जीव गमवावा लागला आहे. या दुर्घटनेनंतर संपूर्ण देशातून हळहळ व्यक्त केली जात आहे. मनोरंजनसृष्टीतील कलाकारही त्याबाबत व्यक्त होताना दिसत आहेत.

पहलगाम हल्ल्यानंतर बॉलीवूड कलाकारांनी व्यक्त केल्या भावना

बॉलीवूडमधील अनेक कलाकारांनी पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर हळहळ व्यक्त केली आहे. तसेच संतापही व्यक्त केला आहे. अभिनेता विकी कौशल, अक्षय कुमार, जान्हवी कपूर, सिद्धार्थ मल्होत्रा, संजय दत्त यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करीत भावना व्यक्त केल्या आहेत. अक्षय कुमारने त्याच्या एक्स अकाउंटवर लिहिले, “पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याची माहिती ऐकून मला खूप वाईट वाटले. निष्पाप लोकांना अशा प्रकारे मारणे हे निंदनीय आहे. त्यांच्या कुटुंबीयांसाठी प्रार्थना.”

अभिनेता संजय दत्तने या दहशतवादी हल्ल्याच्या निषेध करीत लिहिले, “त्यांनी आपल्या लोकांना निर्दयीपणे मारले. हे माफ केले जाऊ शकत नाही. आपण शांत बसणार नाही हे या दहशतवाद्यांना माहीत असण्याची गरज आहे. याचा बदला घेण्याची गरज आहे.” पुढे अभिनेत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा तसेच संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांना विनंती करीत लिहिले की, ते ज्यासाठी पात्र आहेत, त्यांना ते द्या.

अभिनेत्री हीना खानने इन्स्टाग्राम स्टोरीवर “पहलगाम का?” असे लिहीत तिने भावना व्यक्त केल्या. तर बॉलीवूड अभिनेता विकी कौशलने त्याच्या इन्स्टाग्राम या दहशतवादी हल्ल्याबाबत लिहिले, “पहलगाममध्ये जो दहशतवादी हल्ला झाला, त्यामध्ये ज्या कुटुंबांनी त्यांच्या जवळच्या लोकांना गमावले; त्यांच्या दु:खाची कल्पनाही करू शकत नाही. त्यांच्यासाठी मनापासून प्रार्थना”, असे म्हणत अभिनेत्याने त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत. तर, सिद्धार्थ मल्होत्राने पहलगाममध्ये झालेला हल्ला हा भ्याड हल्ला असल्याचे म्हटले. मला आपल्या सैन्यावर पूर्ण विश्वास आहे. ते न्याय देतील. जे निरागस लोक या हल्ल्यात बळी पडले, त्यांच्यासाठी मी प्रार्थना करतो. जय हिंद! तर, अभिनेत्री जान्हवी कपूरने धक्का बसल्याचे म्हटले आहे.

अभिनेते अनुपम खेर यांनीदेखील व्हिडीओ शेअर करीत हळहळ व्यक्त केली. अनेक मराठी कलाकारांनीदेखील सोशल मीडियावर पोस्ट शेअर करीत या हल्ल्याचा निषेध केला आहे. कलाकारांनी या हल्ल्यानंतर हळहळ व्यक्त केल्याचे सोशल मीडियावरील पोस्टवरून पाहायला मिळत आहे.