Anil Kapoor Birthday :१९९० च्या दशकातील सर्वोत्तम अभिनेत्यांपैकी एक असलेले अनिल कपूर आज यशाच्या शिखरावर आहेत. सिनेसृष्टीतील यशस्वी अभिनेत्यांच्या यादीत त्यांचे नाव नेहमीच अग्रस्थानी असते. आजही ते स्क्रीनवर येतात तेव्हा आपली खास छाप सोडतात. मात्र, अनिल कपूर यांना या ठिकाणी पोहोचण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला. त्यांच्या वडिलांची त्यांनी चित्रपटात काम करावे, अशी इच्छा नव्हती, तसेच त्यांच्या घरची आर्थिक स्थितीही ठीक नव्हती. त्यामुळे त्यांना यश मिळवण्यासाठी खूप मेहनत करावी लागली.
अनिल कपूर यांचा आज ६८ वा वाढदिवस आहे. आज जरी ते स्टार असले, त्यांचा फिटनेस सर्वत्र चर्चेत असला तरी एक काळ असा होता, जेव्हा त्यांच्या कुटुंबाला राहण्यासाठी घर नव्हते. ते आपल्या कुटुंबाबरोबर गॅरेजमध्ये राहत होते. इतकेच नव्हे, तर लहान-मोठ्या भूमिकांसाठी ते दिग्दर्शकांच्या घराबाहेर तासन् तास थांबत असत.
स्पॉटबॉयची नोकरी
अनिल कपूर यांनी आपल्या आयुष्यात खूप संघर्ष पाहिला आहे. त्यांच्या वडिलांना हृदयविकाराचा त्रास असल्याचे कळल्यानंतर त्यांनी स्पॉटबॉय म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्यावेळी त्यांच्या घरची आर्थिक परिस्थिती बेताची होती. ते १७-१८ वर्षांचे असताना कुटुंबाची गरज भागविण्यासाठी त्यांनी नोकरी शोधण्यास सुरुवात केली.
अभिनय शाळेत प्रवेश न मिळाल्याचा धक्का
अनिल कपूर लहानपणापासूनच अभिनयात येण्याचे स्वप्न बघत होते. त्यांनी अभिनय महाविद्यालयात प्रवेश घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना प्रवेश न मिळाल्याने ते निराश होऊन रडले होते. मुंबईत शिक्षण घेतलेल्या अनिल कपूर यांनी पुणे येथील एफटीआयआयची परीक्षा दिली होती; मात्र ते अपयशी ठरले. त्यामुळे त्यांना मोठा धक्का बसला. त्यांनी त्या वेळी एफटीआयआयचे संचालक गिरीश कर्नाड यांच्याशी वाद घातला आणि विनंती केली; पण त्यांना प्रवेश मिळाला नाही.
हेही वाचा…नाना पाटेकरांच्या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर ‘वनवास’, चार दिवसांची कमाई फक्त ‘इतके’ कोटी
ब्लॅकमध्ये तिकीटविक्री
‘कॉमेडी नाईट्स विथ कपिल’ या शोमध्ये अनिल कपूर यांनी आपल्या संघर्षमय जीवनाबद्दल सांगितले होते. त्यांनी त्यांच्या बालपणात मित्रांबरोबर ब्लॅकमध्ये तिकिटे विकल्याचे सांगितले.
प्रचंड संघर्षानंतर अनिल कपूर यांचे नशीब बदलले. १९८० साली त्यांनी तेलुगू चित्रपटातून प्रमुख अभिनेत्याच्या भूमिकेद्वारे अभिनयाच्या आकाशात खऱ्या अर्थाने पदार्पण केले. त्यांचा पहिला चित्रपट ‘वामसा वृक्षम’ होता. मात्र, १५ व्या वर्षी त्यांनी हिंदी चित्रपट ‘तू पायल मैं गीत’मध्ये बालकलाकार म्हणून काम केले होते. दुर्दैवाने, हा चित्रपट प्रदर्शित झाला नाही. अनिल कपूर यांनी अभिनयाला सुरुवात करण्यापूर्वी कास्टिंग डायरेक्टर म्हणूनही काम केले होते. त्यांनी ‘हम पाँच’ सिनेमासाठी कास्टिंग केली होती. त्यानंतर त्यांच्या आयुष्यात मोठे बदल झाले आणि आज ते यशस्वी अभिनेते म्हणून ओळखले जातात.