बॉलिवूडचा ‘मिस्टर इंडिया’ आणि प्रसिद्ध अभिनेते अनिल कपूर यांनी हिंदी चित्रपटसृष्टीला अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. अनिल कपूर यांनी आपल्या चित्रपटांनी आणि खास स्टाईलने चित्रपटसृष्टीवर राज्य केलं. जवळजवळ चार दशकांहून अधिक काल चित्रपटसृष्टीत सक्रिय असलेल्या अनिल कपूर यांचा आज ६६वा वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या चित्रपटाच्या सेटवरचा एक खास किस्सा आपण जाणून घेऊयात.
अनिल कपूर यांनी आपल्या करिअरमध्ये दिग्गज अभिनेते जॅकी श्रॉफ यांच्याबरोबर अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. त्या काळात अनिल कपूर आणि जॅकी श्रॉफ यांची जोडी लोकप्रिय होती. पण एकदा एका चित्रपटाच्या शूटिंगवेळी जॅकी श्रॉफ यांनी अनिल कपूरना सलग १७ वेळा थप्पड मारली होती. या गोष्टीचा खुलासा खुद्द जॅकी श्रॉफने केला होता. अनिल कपूर आणि जॅकी श्रॉफ दरम्यानचा हा किस्सा ‘परिंदे’च्या शूटिंगवेळी घडला होता. चित्रपटाला ३० वर्षे पूर्ण झाल्यावर जॅकी श्रॉफ यांनी एका शॉटसाठी अनिल कपूरना सुमारे १७ वेळा थप्पड कशी मारावी लागली होती, याचा खुलासा केला होता.
तब्बूच्या बहिणीने सर्वांसमोर दिलेली अनिल कपूरना धमकी; माधुरी दिक्षीत ठरली होती कारण
‘परिंदा’ चित्रपटात जॅकी श्रॉफनी अनिल कपूरच्या मोठ्या भावाची भूमिका साकारली होती. या चित्रपटात एक सीन होता ज्यामध्ये ते अनिल कपूरना थप्पड मारतात. जॅकी दादांनी या शॉटसाठी अनिल कपूरना थप्पड मारली, शॉट ओके झाल्याचं दिग्दर्शकाने सांगितलं. पण अनिल कपूरना हा शॉट आवडला नाही, त्यामुळे त्यांनी पुन्हा हा शॉट शूट करण्याचा निर्णय घेतला. पण नंतर हा परफेक्ट शॉट येण्यासाठी अनिल कपूर यांना जॅकी श्रॉफकडून एक-दोन नव्हे तर तब्बल १७ थप्पड खाव्या लागल्या होत्या.
याबद्दल बोलताना जॅकी श्रॉफ म्हणाले होते, “त्याला त्याच्या मोठ्या भावाने थप्पड मारली होती, हे दिसावं असं अनिलला वाटत होतं. खरं तर पहिला शॉट ठीक होता आणि हावभावही चांगले होते, पण अनिलला तो शॉट आवडला नाही आणि त्याने तो पुन्हा शूट करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर मी त्याला पुन्हा थप्पड मारली. मात्र, तरी त्याला आवडलं नाही, मग या शॉटसाठी मी त्याला तब्बल १७ थप्पड लगावले. मला त्याला मारायचं नव्हतं, पण मला मारावे लागले. कारण मी फक्त हवेत थप्पड मारले असते तर तो शॉट तितका चांगला आला नसता,” असं जॅकी श्रॉफ यांनी सांगितलं होतं.