बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर आणि तिचा पती आनंद आहुजा यांनी १५ नोव्हेंबरला रात्री फुटबॉलपटू डेव्हिड बेकहॅमचे भव्य स्वागत केले. त्याच्यासाठी या जोडप्याने त्यांच्या घरी डिनर पार्टीचे आयोजन केले होते, ज्यामध्ये अनिल कपूर, अर्जुन कपूर, मलायका अरोरा आणि शाहिद कपूर यांसारख्या कलाकारांची उपस्थिती होती. पार्टीचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. सोनमचा भाऊ व अनिल कपूर यांचा मुलगा हर्ष वर्धन यानेही त्याचा फोटो शेअर केला, पण त्याला एका युजरने ट्रोल केलं. या ट्रोलिंगला त्याने उत्तर दिलं आहे.
हर्ष वर्धन कपूरने एक्सवर (पूर्वीचे ट्विटर) एक फोटो शेअर करत लिहिलं, “काल रात्री डेव्हिड बेकहॅमला भेटलो.. त्याच्याशी युनायटेड आणि क्लबच्या स्थितीबद्दल बोललो.. अधिक माहिती उघड करू शकत नाही.”
या पोस्टवरून एका युजरने हर्ष वर्धनला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. ‘त्याने तुला विचारलं नाही का की तू कोण आहेस’? असं एका युजरने विचारलं. त्यावर हर्ष वर्धन म्हणाला, “भावा, तो माझ्या घरी आला होता. पण तू कोण आहेस?” या पोस्टमध्ये हर्ष वर्धनने हसणारे इमोजी वापरले होते.
दरम्यान, डेव्हिड बेकहॅम माजी फुटबॉलपटू असून तो युनिसेफचा ग्लोबल अॅम्बेसेडर देखील आहे. सध्या तो भारतात आहे आणि सोनम कपूर-आनंद आहुजा यांनी त्याचे भव्य स्वागत केले. असं म्हटलं जातंय की ही पार्टी अत्यंत खासगी होती आणि या पार्टीत फक्त २५ लोक सहभागी झाले होते.